

राजकारणामुळे रायगडचे पालकमंत्री पद अडकले आणि विकासकामेही थांबली असा थेट हल्लाबोल रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी केला आहे. त्या रोहा येथील कार्यक्रमात बोलत होत्या.
निवडणूक काळात आपण स्थानिक पातळीवर विकासकामांची आश्वासने ग्रामपंचायत स्तरावर मतदारांना दिली आहेत. ती पूर्ण करण्यात अडचणी येत असतील तर, याचा विचार नेत्यांनी करायला हवा. पालकमंत्री पदाचा निर्णय घ्यायचा तेव्हा घ्या पण यामुळे रायगड जिल्ह्याला विकासापासून वंचित ठेवू नका असे सांगत आदिती तटकरे यांनी या मुद्द्यावर जोरदार आक्षेप घेतला.
रोहा तालुक्यातील किल्ला येथील ओम नमो शिवाय मंगल कार्यालय येथे बुधवारी सायंकाळी रोहा तालुका कार्यकारिणीच्या सभेच्या निमित्ताने उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांना मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या.
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका म्हणजे कार्यकर्त्यांच्या निवडणुका होणार आहेत. आमच्या निवडणुकांमध्ये तुम्ही जी मेहनत घेतली त्याच्या दहापट मेहनत आता आम्ही घेऊ. राजकीय समज गैरसमज असल्यामुळे आपल्या जिल्ह्याला पालकमंत्री मिळाला नाही. त्यामुळे जिल्हा नियोजन समिती स्थापन झाली नाही. विकास कामासाठी निधी उपलब्ध होत नाहीत, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.
यावेळी बोलताना माजी आमदार अनिकेत तटकरे यांनी आपल्याला लोकसभा निवडणुकीत विधानसभा निवडणुकीत यश मिळाले. सेवा करण्याची संधी मायबाप जनतेने दिली. राज्यातील लाडक्या बहिणींना लाडकी बहीण योजना आदितीताईंच्या नेतृत्वाखाली मिळाली. दादांनी पुरवणी अर्थसंकल्पात घोषणा केली. 15 ऑगस्टला पहिला हप्ता दिला. 2 कोटी 36 लाख महिलांना मदत निधी दिला जात आहे. खा. तटकरे यांच्या माध्यमातून 100 कोटीपेक्षा जास्त निधी आणला गेला. विधान परिषदेच्या माध्यमातून निधी देण्यात आला. राज्यसभा खासदारांच्या माध्यमातूनही निधी देण्यात आला. हे काम झाल्यामुळे आदिती तटकरे या लोकांच्या मनातील पालकमंत्री आहेत, असेही ते म्हणाले.
यावेळी जिल्हाध्यक्ष विजयराव मोरे, जिल्हा चिटणीस मधुकर पाटील, सुरेश मगर, नंदकुमार म्हात्रे, तालुका अध्यक्ष विनोद पाशीलकर, तालुका कार्याध्यक्ष समीर शेडगे, नारायण धनवी, रामचंद्र सकपाळ, रत्नप्रभा काफरे, अप्पा देशमुख, तालुका महीला अध्यक्षा प्रीतम पाटील, शहर अध्यक्ष अमित उकडे, प्राजक्ता चव्हाण, जयवंत मुंडे, आदी उपस्थित होते.