लोकसभा 2024 ला झालेल्या निडणूकीनंतर आता महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेचे पडघम जोरदार वाजायला सुरूवात झाली आहे. महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी पक्षबदलाचे वारे पहावयास मिळत आहेत. रायगड लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार सुनिल तटकरे यांचा 80 हजार मतांनी विजय झाला असला तरी संबंध महाराष्ट्रात महायुतीला अपेक्षित यश मिळवता आले नाही. त्यातच वेगवेगळ्या जनमत चाचणीचे सर्वे लक्ष्यात घेता महायुतीला पुन्हा एकदा सत्ता काबीज करणे अवघड झाले आहे.
गेल्या दोन वर्षात महाराष्ट्रात झालेल्या फोडाफोडीचे राजकारण सामान्य मतदारांना पटले नाही. हाच त्यामागचा अर्थ निघत आहे. श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँ. अजित पवार गटाच्या विद्यमान आ. अदिती तटकरे यांच्या विरोधात अनेकांनी दंड थोपटले आहेत. या मतदारसंघात तगडा उमेदवार देण्यासाठी पक्षश्रेष्ठी बारकाईने लक्ष ठेवून आहेत. मात्र शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद घोसाळकर, उद्धव ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष अनिल नवगणे, राष्ट्रवादी काँ. शरद पवार गटाकडून माणगाव नगरपंचायतीचे माजी नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार, बळीराजा संघटनेचे उपाध्यक्ष कृष्णा कोबनाक हे निवडणूक लढण्यास इच्छुक असून त्यांची नावे चर्चिली जात आहेत.
श्रीवर्धन विधानसभा मतदार संघाचा अभ्यास केला तर लोकसभा निवडणूकीत महायुतीचे उमेदवार सुनिल तटकरे यांना जवळपास 28 हजार मतांचे लीड मिळाले. गेल्या 15 वर्षांपासून सुनिल तटकरे यांचा बालेकिल्ला असलेला हा मतदारसंघ आहे, तरी अपेक्षित यश श्रीवर्धन विधानसभा मतदार संघात लोकसभा निवडणूकीत मिळाले नसल्याने महायुतीत अस्वस्थता आहे. शरद पवारांना मानणारा वर्ग यावेळी त्यांच्याबरोबर नव्हता, परंपरागत मुस्लीम मतदार त्यांच्या विरोधाच उघड नाराजी बोलून दाखवत होता, कुणबी समाजाची असलेली मोठ्या प्रमाणावर मत देखील त्यांना हव्या त्या प्रमाणात घेता आली नाही. ही यामागील प्रमुख कारणे आहेत. महायुतीकडून ही उमेदवारी राष्ट्रवादी अजित पवार गटाला जाणार असून विद्यमान आ. अदिती तटकरे यांनाच पक्षाकडून तिकीट मिळाले आहे.
मागील निवडणूकीत शिवसेनेच्या विनोद घोसाळकरांचा त्यांनी जवळपास 40 हजार मतांनी पराभव केला होता. पहिल्याच टर्ममध्ये त्यांनी प्रथम राज्यमंत्री व त्यांनंतर एकनाथ शिंदे यांच्या मंत्रीमंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून मोठी जबाबदारी पार पाडली. पहिल्याच टर्ममध्ये पक्षवाढीसाठी महाराष्ट्रभर दौरे केले, परंतु त्यांच मतदार संघांतील जनतेला किती वेळ दिला ? असा प्रश्न येथील नागरिक करीत आहेत.
वडील सुनिल तटकरे यांचा दांडगा जनसंपर्क स्वत: खासदार, भाऊ अनिकेत तटकरे माजी आमदार. मतदार संघावर गेली पंधरा वर्षे एकहाती वर्चस्व, कार्यकर्ते यांची मोठी फळी या अदिती तटकरे यांच्या जमेच्या बाजू तर घराणेशाही, मित्र पक्षाला विश्वासात न घेणे त्यांना मानसन्मान न देणे या कारणांमुळे विधानसभेला मित्र पक्ष तटकरे यांचे काम करेल असं चित्र सध्या नसल्याने त्यांना या गोष्टींचा नुकसान होण्याची चिन्हे सध्या तरी दिसत आहेत.
लोकसभा निवडणूकीत दस्तूरखुद्द शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी श्रीवर्धन विधानसभा मतदार संघाची उमेदवारी जिल्हाप्रमुख अनिल नवगणे यांना जाहीर केली होती. परंतु लोकसभा निवडणूकीनंतर अनंत गिते व नवगणे यांच्यात समन्वय नसल्याचे चित्र दिसते.
शिवसेना शिंदे गटाकडून दक्षिण रायगडचे जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर यांनाच पक्षाकडून तिकीट देण्याची मागणी गेल्या वर्षभरापासून जोर धरत आहे. आमच्या कार्यकर्त्यांना राष्ट्रवादीकडून सन्मान मिळत नाही, शासनाच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री उदयजी सामंत यांचा फोटो न टाकता फक्त तटकरे परिवाराचा फोटो टाकला जात असल्याच्या तक्रारी अनेक वेळा या मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी बोलून दाखवल्या आहेत.
श्रीवर्धनमधील शिवसेनेच्या हक्काचा निधी देखील राष्ट्रवादीकडून थांबवला गेल्याचे आरोप व मित्रपक्ष असून देखील शिवसेनेचे कार्यकर्ते राष्ट्रवादीकडून पक्षप्रवेश केल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे श्रीवर्धन शिवसेना राष्ट्रवादी वाद मोठा उफाळला असून शिवसेना शिंदे गट जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर यांच्याकडून विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी जोरदार तयारी दिसत आहेत. पक्षाकडून घोसाळकर यांना गेल्या वर्षभरापासून बूथप्रमुख ते तालुकाप्रमुख संघटना बांधण्यात त्यांना यश आले आहे, मागील विधानसभा निवडणूक त्यांचे बंधू विनोद घोसाळकर यांनी लढविल्याने मतदार संघाचा दांडगा अनुभव त्यांना आहे. प्रमोद घोसाळकर यांनी श्रीवर्धन विधानसभा मतदार संघांतील प्रत्येक तालुक्यात पक्ष बांधणीसाठी शिवसेना सदस्य नोंदणी अभियान, बूथ प्रमुख मेळावा, श्रीवर्धन येथे मध्यवर्ती कार्यालयाचे उद्धाटन, श्रीवर्धन शिवसेनेच्या वतीने दहिहंडी उत्सव, म्हसळा शिवसेना पक्षाच्या वतीने मंगळागौर कार्यक्रम अशा अनेक कार्यक्रमांचे आयोजन केल्यामुळे पक्षाला नवसंजीवनी देण्याचे काम झाले. सद्यस्थितीत श्रीवर्धन विधानसभा मतदार संघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष महत्वाचा विरोधी पक्ष असून देखील पक्षाकडून कोणतीही हालचाल दिसत नाही. परंतु महायुतीतीलच मित्र पक्षाकडून श्रीवर्धन विधानसभा लढविण्याच्या घोषणा होताना दिसत आहेत. सध्या श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघात सध्यातरी घोसाळकर यांनी सर्व विरोधकांची मुठ तटकरेंच्या विरोधात बांधल्याने तटकरे विरूद्ध घोसाळकर थेट लढत होण्याची शक्यता नाकारता येत नाही. खा. सुनिल तटकरे यांचे राजकीय वजन पाहता ते शिवसेना शिंदे गटाला कश्या पद्धतीने शांत करणार ? की हा संघर्ष विधानसभा निवडणूकीत अधिक तीव्र होईल ? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
लोकसभा निवडणूकीत महायुतीचे उमेदवार सुनिल तटकरे यांना जवळपास 28,000 मतांचे लीड मिळाले. गेल्या 15 वर्षापासून सुनिल तटकरे यांचा बालेकील्ला असलेला हा मतदारसंघ असला तरी अपेक्षित यश श्रीवर्धन विधानसभा मतदार संघात लोकसभा निवडणूकीत मिळाले नसल्याने महायुतीत अस्वस्थता आहे.