

महाड : रायगड पालकमंत्री पदाचा वाद तीन महिन्यापासून रखडलेला असताना आज महाड मधील एका कार्यक्रमासाठी आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गाडीतूनच नामदार भरत शेठ गोगावले व नामदार अदिती तटकरे यांनी एकत्रित प्रवास केला. महाड न्यायालयाच्या भूमिपूजन कार्यक्रमाकरिता आज राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री हे उपस्थित होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन केल्यानंतर भूमिपूजन सोहळ्यासाठी जाण्याकरता निघालेल्या मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी महाडचे आमदार विद्यमान आमदार भरत शेठ गोगावले व नामदार आदिती तटकरे यांना आपल्याच गाडीत घेऊन प्रवास केल्याचे चित्र उपस्थित नागरिकांना तसेच दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना सुखद धक्का देऊन जाणारे होते. मात्र, दोन तासातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालकमंत्री पदाबाबत केलेल्या वक्तव्याने दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झालेली उत्सुकता विरून गेल्याचे दिसून आले. पत्रकारांनी देवेंद्र फडणवीस यांना या संदर्भात विचारणा केली असता रायगडचे पालकमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित दादा पवार काम बघत असल्याचे सांगून पत्रकारांच्या प्रश्नाला त्यांनी आगळ्या पद्धतीने बगल दिल्याचे दिसून आले.
रायगड पालकमंत्री पदाचा वाद हा येणाऱ्या काही दिवसात सुटेल अशी अपेक्षा नामदार भरत शेट गोगावले यांनी दोन दिवसापूर्वीच व्यक्त केली होती. मात्र आज प्रत्यक्ष मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री महाडमध्ये येऊन देखील या संदर्भातील निर्णय न झाल्याने दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये याबाबत असणारी उत्सुकता व अपेक्षा कायम राहिल्याचे दिसून आले.