

पनवेल : खांदेश्वर परिसरातील नागरिकांना अस्वस्थ करणाऱ्या एका गंभीर प्रकाराला अखेर वाचा फुटली आहे. पनवेल महानगरपालिकेची कोणतीही अधिकृत परवानगी न घेता सुरू करण्यात आलेल्या नीळकंठ ग्रुपच्या अनधिकृत इमारत प्रकल्पावर आज (दि.११) महत्त्वाची कारवाई झाली.
महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना अधिनियम (एमआरटीपी) कायद्यानुसार या ग्रुपविरुद्ध कामोठे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई कामोठे प्रभाग समितीचे अधीक्षक दशरथ भंडारी यांच्या अधिकृत तक्रारीवरून करण्यात आली असून, शहरात अनधिकृत बांधकाम विरोधात हे एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.
नीळकंठ ग्रुपने खांदेश्वरमधील प्रमुख रस्त्यालगत मोठ्या प्रमाणावर बांधकाम सुरू केले होते. मात्र, त्यासाठी त्यांनी पनवेल महापालिकेची कोणतीही अधिकृत परवानगी घेतलेली नव्हती. बांधकामाच्या वेळी योग्य सुरक्षा उपाययोजना न घेतल्यामुळे काही दिवसांपूर्वी या ठिकाणी गंभीर दुर्घटना घडली. इमारतीशेजारील फुटपाथ अचानक खचला आणि मुख्य रस्त्याचा एक भाग देखील धसकला. त्यामुळे सार्वजनिक मालमत्तेचे मोठे नुकसान झाले.
स्थानिक रहिवाशांसाठी हे अत्यंत धोकादायक ठरण्याची शक्यता निर्माण झाली होती. या घटनेनंतर विकासकाने केलेले हे काम अनधिकृत असल्याची नोटीस बजावून काम थांबवण्याचे आदेश दिले होते. मात्र विकासकाने येथे विकास कार्य सुरूच ठेवले होते. पालिकेच्या नोटिसीला देखील त्याने केराची टोपली दाखवली होती.
या घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली. अनेकांनी प्रशासनाच्या निष्क्रियतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. या पार्श्वभूमीवर शिवशाही सेनेचे अध्यक्ष राजकुमार पाटील यांनी आक्रमक भूमिका घेत आंदोलने छेडली. त्यांनी पालिकेच्या दुर्लक्षित कारभाराचा तीव्र शब्दांत निषेध करत संबंधितांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली होती.
राजकुमार पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन पालिकेच्या कारभारावर ताशेरे ओढले होते. "पनवेल महानगरपालिका ही बिल्डर लॉबीसमोर गुडघे टेकत आहे. सार्वजनिक ठिकाणी नागरिकांच्या जीवाशी खेळ करणारे बिल्डर आणि त्यांच्यावर कारवाई न करणारे अधिकारी दोघेही जबाबदार आहेत. आम्ही शांत बसणार नाही." असा इशारा देखील त्यांनी दिला होता. शिवशाही सेनेच्या आंदोलनानंतर दबाव निर्माण झाला आणि अखेर आज प्रशासनाने दखल घेतली.
कामोठे प्रभाग समितीचे अधीक्षक दशरथ भंडारी यांनी पोलिस ठाण्यात सविस्तर तक्रार दाखल करून नीळकंठ ग्रुपच्या बांधकाम व्यावसायिकांवर एमआरटीपी कायद्यानुसार गुन्हा नोंदविला. या प्रकरणात पुढील तपास सुरू आहे. सदर प्रकरणाचा तपास कामोठे पोलिस करत असून, संबंधित बिल्डरवर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन पोलिस प्रशासनाकडून देण्यात आले आहे.