तळा : संध्या पिंगळे तळा तालुक्यातील गिरणे हे गाव व्यवसाय व शेतीसाठी प्रसिद्ध असणारे गाव आहे. या गावातील शेतकरी पारंपरिक व आधुनिक पध्दतींचा अवलंब करून शेतीत विविध प्रयोग करत आहेत, त्यांतील गावचे अध्यक्ष व बांधकाम क्षेत्रातील उद्योजक जयेंद्र पाशिलकर यांनी मोठ्या मेहनतीने त्यांच्या दहा गुंठे शेतीत फुलशेती फुलवली आहे.
ही फुलशेती करताना त्याच्या बरोबर मिरची, आलू, माठ, मका, वांगा, पालक, कोथिंबीर, अशी भाजीची पिकेही घेत आहेत. ही लागवड करताना आधुनिक पध्दतीने लागवड केली व अनुभवी शेतकरी व कृषी अधिकारी, स्वदेस फाउंडेशन आदींचे मार्गदर्शन घेतले.
जी पिके येथे होत नाहीत अशी अनेक पिके घेण्याचा निश्चय करून मेहनत, कष्ट, चिकाटीच्या बळावरती ही पिके प्रायोगिकतत्वावरती थोड्या भागात मागील वर्षी केली होती. त्यातून चांगले उत्पन्न मिळाले होते. यावर्षी दहा गुंठ्यांत या पिकांची लागवड कृषी व स्वदेस फाउंडेशनच्या मार्गदर्शनाने २००० झेंडूच्या फुलांची रोपे लावली आहेत.
२०० मिरचीची रोपे लावली आहेत. त्याच बरोबर मका, आलू, माठ, कोथिबीर, वांगा, भेंडी अशा रोपांची लागवड केली असून आता ही रोपे चांगली जोमाने येऊन चांगले उत्पन्न देत आहेत. ही पिके घेताना आपल्याकडे चांगली शेती आहे.
त्या शेतीमध्ये झेंडूची विविध जातींची फुलांची रोपे लावली रोपे लावल्यानंतर त्या रोपांना शेणखत, रासायनिक खते यांचा योग्य प्रमाणात मारा करून ही रोपे जोपासल्यानंतर चांगली फुले होण्यास सुरुवात झाली. त्यावेळी सदर शेतकरी आनंदी झाला. दोन दिवसाआड फुले मिळण्यास सुरू झाली आहे.
दिवाळी उत्सव जवळ येत असून दिवाळी सणासाठी चांगली मागणी फुलांची होणार आहे. या शेतकऱ्याचा आदर्श सर्वांनी घ्यावा अशी शेती केली आहे. या शेतीतून चांगले उत्पन्न मिळणार आहे. जयेंद्र पाशिलकर या शेतकऱ्यांशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, जिद्द, मेहनत व कष्ट केले की त्याचे फळ मिळते. रायगड जिल्ह्यात बेरोजगारीचा प्रश्न आहे. शेतीचा उद्योग म्हणून उपयोग केला तर येथे चांगला रोजगार मिळू शकतो हे या युवकाने दाखवून दिले आहे.
आपली शेतीही उत्पन्न देणारी आहे. झेंडूच्या एका रोपामागे शंभर रूपये उत्पन्न मिळेल तसेच वांगा व मिरचीच्याही एका रोपांपासूनही १०० रूपये उत्पन्न निश्चित मिळेल, असा विश्वास पाशिलकर यांनी व्यक्त केला आहे. आपल्या भागातही सर्व प्रकारची पिके घेऊन उत्पन्न मिळते. तरुणांनी आपल्या शेतीकडे वळावे. फक्त मेहनत घेण्याची क्षमता आपल्यात हवी आहे, असेही पाशिलकर म्हणाले.