

पनवेल : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पनवेल विधानसभा मतदार संघात शनिवारी दोन ठिकाणी केलेल्या कारवाईत पनवेल परिसरातून 9 लाख 37 हजाराची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.
मिळालेल्या खबरीच्या अनुषंगाने पोलीस उपनिरीक्षक विनोद लभडे व त्यांचे पथक यांनी पनवेल बावन बंगला कडून कामोठे कडे जाणार्या हिरो होंडा सीटी डिलक्स ही दुचाकी संशयास्पद वाटल्याने गाडी अडवून तपासणी केली असता त्या गाडीमध्ये 5 लाख 85 हजाराची रोख रक्कम आढळून आली. सदरची रक्कम संबंधितास ताब्यात घेवून पुढील कार्यवाहीसाठी भरारी पथक (एफएसटी) क्र.03 यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली व सदर पथकाने सदर रक्कम जप्त केली आहे.
दुसर्या घटनेत आचारसंहिता पथकांतर्गत वायूवेग पथक क्र. 03 मोटार वाहन निरीक्षक दिलीप दराडे यांनी कळंबोली कडे जाणार्या पांढर्या रंगाच्या टोयाटो इनोव्हा संक्षयास्पद वाटल्याने गाडी अडवून सदर गाडीची तपासणी केली असता, त्या गाडीमध्ये 2 लाखाची रोख रक्कम आली. सदरील रक्कम जप्त करण्यात आली. तिसर्या घटनेत आचारसंहिता पथकांतर्गत स्थिरसर्वेक्षण पथक क्र.08 ने शेडुंग चेक नाका येथे रोडवरुन जाणा़र्या पांढर्या रंगाच्या टोयाटो इनोव्हा चार चाकी गाडीस थांबवून तपासणी केली असता त्या गाडीमध्ये 1 लाख 92 हजार 20 रुपयांची रोख रक्कम आढळून आली असल्याने सदर पथकाने ती रक्कम जप्त केली आहे.