

रायगड जिल्ह्याला डेंग्युने बेजार केले आहे. गेल्या सुमारे दीड वर्षा रायगड जिल्ह्यात 9 हजार 600 डेंग्यू सदृष्य आजाराची लक्षणे आढळणार्या रुग्णांची तपासणी केली आहे. त्यात 798 हे डेंग्यू बाधित आढळले आहेत. जिल्ह्यात डेंग्यूचे प्रमाण गेल्यावर्षी पेक्षा कमी आहे. गेल्या 5 महिन्यांत 39 रुग्ण पॉजिटीव्ह आले आहेत. यामध्ये एक हजार 738 लोकांचे नमुने तपासण्यात आले असल्याची माहिती जिल्हा हिवताप कार्यालयाकडून देण्यात आली.
पावसामुळे अनेक सखल भागात पाणी साचून राहिल्याने डासांचा प्रदुर्भाव वाढू लागला आहे. जिल्ह्यातील पनवेल ग्रामीणसह सर्व तालुक्यात हिवताप विभागामार्फत रक्ताचे नमुने तपासले जात आहेत. यावर्षी जानेवारी ते जूनमध्ये पनवेल शहरी भागात 1 हजार 152 जणांचे रक्ताचे नमुने तपासण्यात आले, त्यात 25 जणांचे पॉझिटिव्ह आले असून त्यांना उपचार करण्यात येत आहेत. तर उरण येथे 58 जणांचे नमुने तपासले असता 2 जण पॉझिटिव्ह आले.
पनवेल ग्रामीण भागात 121 जणांचे नमुने तपासले. त्यात 1 जण पॉझिटिव्ह आला. खालापूर येथे 44 जणांपैकी 1 जण पॉझिटिव्ह, सुधागड येथे 26 जणांपैकी 1 पॉझिटिव्ह, अलिबाग येथे 66 जणांपैकी 4 पॉझिटिव्ह, मुरुड येथे 143 जणांचे नमुने तपासले असता 2 जण पॉझिटिव्ह आले. रोहा तालुक्यात 28 जणांचे नमुने तपासले, तेथे 1 पॉझिटिव्ह आला. माणगाव तालुक्यात 100 जणांचे नमुने तपासले असता 2 जण पॉझिटिव्ह आले. उर्वरित कर्जत, तळा, श्रीवर्धन, म्हसळा, महाड, आणि पोलादपूर येथे 6 महिन्यात एकही डेंग्यू रुग्णाची नोंद झाली नसल्याची माहिती जिल्हा हिवताप कार्यालयाकडून देण्यात आली.
गेल्या वर्षभरात पनवेल शहरात केवळ 4 हजार 180 लोकांचे नमुने तापासले असता 382 हे पॉझिटिव्ह निघाले होते. म्हसळा आणि श्रीवर्धन वगळता अन्य तालुक्यात 377 डेंग्यूचे रुग्ण आढळून आले होते.
ज्या तालुक्यात डेंगू सदृश्य परिस्थिती निर्माण होते, तेथे आमच्या विभागाचे कर्मचारी जाऊन सर्वेक्षण करतात. डेंग्यूची अळी नष्ट करण्यासाठी ऑबिट द्रावण हे मिसळून दिले जाते. आमच्या विभागामार्फत आवाहन करण्यात येते की, घराचा परिसर अथवा टेरेसवर पडलेल्या रिकाम्या कुंड्या प्लॅस्टिकच्या वस्तू, टायर यासारख्या वस्तूंमध्ये पावसाचे पाणी साचून त्यात डासांची उत्पत्ती स्थाने निर्माण होतात. अशी ठिकाणे नष्ट करावीत. खिडक्यांना जाळ्या बसवाव्यात त्यामुळे डासांचा शिरकाव होणार नाही. आजाराची लक्षणे आढळल्यास डॉक्टर यांचा सल्ला घ्यावा.
सिद्धार्थ चौरे, कार्यालयीन अधीक्षक, जिल्हा हिवताप कार्यालय