Raigad: महाड दुर्घटनेतील मृताच्या वारसाना ३० लाखांचा धनादेश सुपूर्द | पुढारी

Raigad: महाड दुर्घटनेतील मृताच्या वारसाना ३० लाखांचा धनादेश सुपूर्द

महाड, पुढारी वृत्तसेवा: महाड औद्योगिक वसाहतीतील ब्ल्यूजेट कंपनीतील दुर्घटनेत मृत्यू झालेल्या कामगारांच्या वारसांना आर्थिक मदत देण्यास प्रारंभ झाला आहे. महाड तालुक्यातील चोचिंदे येथील आदित्य मोरे या मृत कामगाराच्या वारसांना कंपनी प्रशासनातर्फे ३० लाखांचा पहिला धनादेश सुपूर्त करण्यात आला.

ब्ल्यूजेट कंपनीमध्ये शुक्रवारी (दि. ३) झालेल्या भीषण दुर्घटनेमध्ये ११ कामगारांचा मृत्यू झाला होता. यावेळी मृतांच्या वारसांना कंपनी प्रशासनाने ३० लाखांची मदत आणि मुख्यमंत्री सहायता निधीतून ५ लाख व विम्याची अतिरिक्त रक्कम अशी आर्थिक मदत देण्याचे जाहीर केले होते.

आगीत होरपळल्याने ११ कामगारांच्या मृतदेहांची ओळख पटवण्यासाठी त्यांची जनुकीय चाचणी केली जात आहे. त्यानुसार आदित्य मोरे यांची ओळख पटवण्याची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाली आहे. प्रशासनाच्या वतीने ३० लाखांचा पहिला धनादेश मृत आदित्य मोरे यांच्या घरी जाऊन त्यांच्या वडिलांकडे देण्यात आला.

यावेळी आमदार भरतशेठ गोगावले, युवा सेना कोअर कमिटी सदस्य विकास गोगावले, फॅक्टरी इन्स्पेक्टर केंद्रे, तहसीलदार महेश शितोळे, डीवायएसपी शंकर काळे, महाडचे पोलीस निरीक्षक मिलिंद खोपडे आदी अधिकारी उपस्थित होते.

मृतदेहांची कायदेशीर प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आली आहे. लवकरात लवकर सर्व मृतांच्या वारसांना जाहीर झालेली संपूर्ण मदत देण्यात येईल, असे आश्वासन फॅक्टरी इन्स्पेक्टर केंद्रे यांनी यावेळी दिले.

हेही वाचा 

Back to top button