महाड दुर्घटना : ब्ल्यूजेट कंपनीतील भीषण अपघाताचे ८० तास | पुढारी

महाड दुर्घटना : ब्ल्यूजेट कंपनीतील भीषण अपघाताचे ८० तास

महाड; पुढारी वृत्तसेवा : महाड नव्हे तर रायगड जिल्ह्याच्या औद्योगिक क्षेत्राच्या इतिहासात सर्वात भीषण म्हणून नोंद झालेल्या महाड वसाहती मधील ब्ल्यू जेट केमिकल कंपनीच्या अपघाताची नोंद होणार आहे.

शुक्रवार तीन नोव्हेंबर रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास नियमितपणे कंपनीमध्ये उत्पादना करता कामगार व कर्मचाऱ्यांची हालचाल सुरू होती. याचदरम्यान रिअॅक्टर मध्ये झालेल्या वायू गळती व त्यानंतरच्या स्फोटाने काही कामगारांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची हालचाल सुरु झाली. याचवेळी मुख्य इमारतीमध्ये 11 कामगार अडकल्याचे निष्पन्न झाले.

या स्फोटाची तीव्रता एवढी होती की, सुमारे 24 तासांपेक्षा जास्त काळानंतरही प्रत्यक्ष घटनास्थळी जाणे अशक्य होते. स्थानिक यंत्रणा व महाड उत्पादक संघटनेच्या प्रशिक्षित पथकाला देखील या ठिकाणची भीषणता लक्षात घेऊन घटनास्थळी पोहोचणे अशक्य झाल्याने नागोठणा येथील रिलायन्स कंपनीच्या तज्ञ पथकाचे प्रयत्न देखील तुकडे ठरले होते.

अखेरीस स्थानिक प्रशासनाने घटनेचे गांभीर्य ओळखून पुणे येथील एनडीआरएफच्या पथकाला पाचारण करण्याचा निर्णय घेतला. शुक्रवारी (दि. ३) रात्री अकरा वाजल्यापासून सुरू झालेल्या या पथकाच्या अथक प्रयत्नांना सोमवारी (दि. ६) सायंकाळी सातच्या सुमारास शेवटचा मृतदेह करण्यात यश आल्याने सर्च ऑपरेशनची समाप्ती झाल्याची घोषणा स्थानिक प्रशासनाकडून करण्यात आली.

महाड औद्योगिक वसाहतीच्या अतिरिक्त क्षेत्रात असलेल्या ब्ल्यूजेट या कंपनीमधील या भीषण अपघाताने अनेक बाबी समोर आले असून अद्ययावत यंत्रणेचा अभाव असल्याचे निष्पन्न झाले आहे.

शुक्रवारी (दि. ६) अपघाताचे वृत्त समजल्यानंतर या ठिकाणी भेट दिली असता कंपनीमधील सुरक्षा विषयक असलेल्या त्रुटी प्राधान्याने पहावयास मिळाल्या या संदर्भात संबंधित विभागांकडून आगामी काळामध्ये चौकशी केली जाणार असल्याचे त्यानंतरच्या काळात रायगड जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक व स्थानिक आमदार भरतशेठ गोगावले यांनी स्पष्ट केले आहे.

औद्योगिक वसाहती मधील होणाऱ्या दुर्घटना या अपघाती असल्या तरीही दुर्घटनेच्या पश्चात त्यावर उपाययोजना करण्यात आवश्यक असलेली यंत्रणा देखील तेवढीच सक्षम असणे गरजेचे असताना महाडमध्ये अशा पद्धतीची यंत्रणा उपलब्ध नसल्याने संबंधित घटनास्थळी पोहोचणे व त्यामध्ये अडकलेल्या कामगारांना बाहेर काढणे निव्वळ अशक्य झाले. कदाचित या झालेल्या विलंबामुळे देखील काही कामगारांना आपला प्राण गमवावा लागला असेल अशा प्रतिक्रिया स्थानिक लोकांमधून व्यक्त होत होत्या.

या कारखान्याच्या उत्पादनासंदर्भातही संदिग्धता व्यक्त होत असून उत्पादनासंदर्भात संबंधित विभागाकडून सखोल चौकशी करण्याची मागणी केली जात आहे. मागील पाच वर्षांमध्ये महाड औद्योगिक वसाहतीमध्ये झालेल्या चार ते पाच भीषण आगीमध्ये सुदैवाने मनुष्यहानी झाली नव्हती मात्र त्या प्रसंगा नंतरही स्थानिक प्रशासनाकडून व औद्योगिक वसाहती मधील कारखानदारांकडून आवश्यक असणाऱ्या सुरक्षा यंत्रणांची निर्मिती बाबत झालेले दुर्लक्ष तेवढेच अनाकलनीय आहे.

कारखान्यामधील सुरू असलेले मोठे बांधकाम व त्यादरम्यानच काही भागांमध्ये सुरू झालेले उत्पादन पाहता या संदर्भात शासनाच्या लेबर ऑफिसर व फॅक्टरी इन्स्पेक्टर करून होणारी नियमित पाहणी दरम्यान कंपनीमधील अत्यावश्यक बाबींकडे दुर्लक्ष झाले किंवा कसे हे देखील पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

महाड औद्योगिक वसाहतीच्या इतिहासातील सर्वात भीषण दुर्घटना म्हणून ब्ल्यूजेट मधील अपघाताची नोंद होत असताना भविष्यकाळात अशा पद्धतीच्या दुर्दैवाने होणाऱ्या अपघातानंतर तातडीने घटनास्थळी पोहोचण्यासाठी आवश्यक असलेल्या यंत्रणेकडे आता शासनाने गंभीरपणे पाहणे आवश्यक झाले आहे.

Back to top button