रायगड : महाडमधील खासगी कंपनीविरोधातील कामगारांच्या उपोषणात दोघांची प्रकृती खालावली | पुढारी

रायगड : महाडमधील खासगी कंपनीविरोधातील कामगारांच्या उपोषणात दोघांची प्रकृती खालावली

महाड; पुढारी वृत्तसेवा : महाड औद्योगिक वसाहतीमधील टाइम टेक्नो प्लास्ट कंपनीतील कामगारांच्या उपोषणाच्या आठव्या दिवशी दोन आंदोलकांची प्रकृती खालावल्याने प्रकरण चिघळण्याची शक्यता आहे. वेतन वाढी संदर्भातील सुरू असलेला बेमुदत आमरण उपोषणाचा आजचा आठवा दिवस आहे. दोन कामगारांच्या प्रकृतीमध्ये झालेल्या बदलानंतर त्यांना तातडीने त्यांच्या महाड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यामुळे कामगार वर्गामध्ये कंपनी व्यवस्थापनाविरोधात तीव्र असंतोषाची भावना निर्माण झाली असून कोणत्याही क्षणी या ठिकाणी उद्रेक होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

महाड एमआयडीसीतील टाईम टेक्नो प्लास्ट या कंपनीतील कामगार व्यवस्थापनाच्या गळचेपी विरोधात गेले आठ दिवसांपासून दुसऱ्यांदा उपोषणाला बसले आहेत. परंतु कंपनी प्रशासन, व्यवस्थापन तसेच कामगार युनियन त्यांना कोणत्याही प्रकारचा न्याय देण्यास समर्थ ठरताना दिसत नसून त्यांची साधी चौकशीही केल्याचे आढळून येत नाही अशी प्रतिक्रिया कामगारवर्गातून उमटत आहे.

३९ कामगारांपैकी आठ कामगार उपोषणाला बसले होते यातील दोघांची प्रकृती या आधीच खालावल्यामुळे त्यांच्यावर उपचार करण्यात आले होते. दरम्यान आज (दि. 11) सुहास शिंदे,निलेश महाडिक,चंद्रकांत शिंदे,विजय सोनवणे,अनंत गुरव,दिनेश नवघरे या सहा कामगारांची प्रकृती जास्तीची खालावल्यामुळे त्यांना महाड ग्रामीण रुग्णालयात तातडीने हलविण्यात आले आहे.

Back to top button