रायगड : मुसळधार पावसामुळे लाडवली गावाचा विद्युत पुरवठा खंडित

नाते; इलियास ढोकले : मागील 48 तासांपासून सुरू असलेल्या महाड तालुक्यातील मुसळधार पावसाने विद्युत पुरवठा खंडित झाला आहे. या खंडित पुरवठ्याचा मोठा फटका वाढवली गावासह परिसरातील ग्रामस्थांना बसला आहे. मागील 18 तासांपासून परिसरातील विद्युत पुरवठा बंद असून भर पावसामध्ये वीज मंडळाचे कर्मचारी हा पुरवठा पूर्ववत करण्याचे युद्ध पातळीवर प्रयत्न सुरु आहे.
यासंदर्भात वीज मंडळाच्या संबंधित कर्मचाऱ्यांकडे विचारणा केली असता वाढवली परिसरातील डीपीमध्ये बिघाड झाल्याने विद्युत पुरवठा खंडित झाल्याचे कारण सांगण्यात आले आहे. लाडवली ग्रामपंचायत हद्दीमधील ज्या ठिकाणी प्रत्यक्ष काम सुरू आहे त्या ठिकाणी भेट देऊन संबंधित कर्मचाऱ्यांकडे विचारणा केली असता त्यांच्याकडे भर पावसामध्ये काम करताना देखील वीज मंडळाकडून अत्यावश्यक असलेल्या सुरक्षित साधनांची व्यवस्था करण्यात आली नसल्याचे विदारक वास्तव समोर आले आहे.
यामुळे अशा युद्ध पातळीवर कामादरम्यान संबंधित कर्मचाऱ्याला काही दुखापत झाल्यास याची जबाबदारी कोण घेणार अशी विचारणा आता लाडवली ग्रामस्थांकडून वीज मंडळाच्या अधिकाऱ्यांना केले जात आहे.
दरम्यान आज रविवार (दि. १) असल्याने गोरेगाव येथील कार्यकारी अभियंता कार्यालयातून पर्यायी यंत्रणेची व्यवस्था होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे सकाळपासून येथील वीज मंडळाचे तीन ते चार कर्मचारी आपल्या तुटपुंज असणाऱ्या सुरक्षित साधनांच्या मदतीने विद्युत पुरवठा पूर्ववत करण्याचे काम करीत आहेत, मात्र आज रात्रीपर्यंत नियमित पद्धतीने विद्युत पुरवठा होण्याच्या शक्यता कमी असून तात्पुरती स्वरूपात परिसरातील नागरिकांसाठी वीज उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर केले जाणार असल्याचे या कर्मचाऱ्यांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. भर पावसामध्ये काम करणाऱ्या या वीज कर्मचाऱ्यांना लाडवली परिसरातील स्थानिक ग्रामस्थ मंडळांनी सकाळपासूनच सहकार्याचा हात पुढे केला आहे. एकूणच आलेल्या अडचणींवर मात करण्यासाठी तसेच नागरिकांच्या सोयी सुविधा तातडीने प्राप्त व्हाव्यात म्हणून वीज मंडळाचे कर्मचारी असणाऱ्या तुटपुंज्या सुरक्षित साधनांच्या मदतीने भर पावसातही काम करत असल्याचे चित्र पाहून परिसरातील नागरिकांकडून त्यांना धन्यवाद देण्यात येत आहे.