रायगड : पोलीस पथकाचे वाहन थेट युवकाच्या अंगावर; जुगार अड्ड्यावर छाप्यादरम्यानची घटना | पुढारी

रायगड : पोलीस पथकाचे वाहन थेट युवकाच्या अंगावर; जुगार अड्ड्यावर छाप्यादरम्यानची घटना

पनवेल; पुढारी वृत्तसेवा : जुगाराच्या अड्ड्यावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पनवेल शहर पोलिसांच्या वाहनाने एका व्यक्तीला उडवल्याची धक्कादायक घटना पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. या घटनेत पोलीस वाहनाच्या धडकेत जुगारी गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर पनवेलमधील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. त्यासोबत या पोलीस वाहनाने जवळच असलेली संरक्षक भींत पाडली आहे.

पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शासकीय अद्यापन महाविद्यालयाच्या आवारात 4 ते 5 मुले जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. दरम्यान पोलीस डायल नं.112 (वाहन क्रं. MH-12 एस क्यू-1982) ही पेट्रोलिंगसाठी फिरत असलेली गाडी घटनास्थळी पोहोचली. पोलीस वाहन पाहून ही मुले पळू लागली. पोलीस वाहन या मुलांचा पाठलाग करत होते. यासाठी पोलीस वाहन चालकाने वेग देखील वाढवला. धावत सुटलेल्या मुलांपैकी एक मुलगा शेजारी असलेल्या संरक्षक भीतीवर चढण्याचा प्रयत्न करत होता.  याच दरम्यान पोलीस वाहन चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने वाहन थेट भिंतीवर चढणाऱ्या मुलाच्या अंगावर गेले. मुलाला पोलीस वाहनाची बसलेली धडक इतकी भयानक होती की, या वाहनाच्या धडकेमुळे भींत देखील पडली. यामध्ये तरुण गंभीर जखमी झाला आहे.
ही घटना घडताच जखमी युवकाला उचलून जवळील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले, मात्र याच वेळी जमाव आणि पोलिसांमध्ये वादावादी झाल्याची घटना घडली आहे. सध्या या जखमी युवकावर गांधी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. अशोक मंजुळे (वय 25 रा. इंदिरा नगर झोपडपट्टी) असे जखमी युवकाचे नाव आहे.

फिल्मी स्टाईलने कारवाई

सिनेमात शोभेल अशा पद्धतीने कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलिसांना ही कारवाईच अंगलट आली आहे. हे सर्व युवक पळू लागल्याने पोलीस वाहन त्यांचा पाठलाग करत होती. एका युवकाला पकडत असताना थेट त्याच्यावर अंगावरच गाडी गेली. यामध्ये युवक चिरडला गेला आणि जखमी झाला.

Back to top button