

पेण : स्वप्नील पाटील
आषाढी एकादशी आणि राखी पौर्णिमेच्या यशस्वी कामगिरीनंतर आता गणेशोत्सवासाठी देखील राज्याचे एसटी महामंडळ सज्ज झाले आहे. यंदा मुंबई ठाणे सारख्या शहरांमध्ये कामानिमित्त स्थायिक झालेल्या कोकणवासीयांना गणेशोत्सव काळात गावी येण्यासाठी एसटी महामंडळाने पाच हजाराहून अधिक फेर्या सज्ज ठेवल्या आहेत. यामध्ये पाच हजार गाड्यांमध्ये रायगड विभागातून देखील जवळपास दोनशे गाड्यांचा सहभाग असणार आहे.
यंदाचा गणेशोत्सव 27 ऑगस्टपासून जरी असला तरी 23 तारखेला येणारा शनिवार आणि 24 तारखेला आलेला रविवार पाहता याच दिवशी अनेक कोकणवासी जे कामानिमित्त मुंबई, ठाणे, पालघर या ठिकाणी स्थायिक झाले आहेत ते जाणार असल्याचा विचार करून एसटी महामंडळाने 23 तारखेपासून 26 तारखेपर्यंत चार दिवसात पाच हजारहून अधिक एसटीच्या फेर्यांसाठी गाड्या तैनात ठेवल्या आहेत.
यामध्ये आधीच मुंबईमधून 1500 हून अधिक, पालघर मधून 500 हून अधिक तर ठाणे येथून 2000 हून अधिक असे एकूण चार हजार हून अधिकचे ग्रुपिंग बुकिंग एसटी महामंडळाकडे झाले आहे. तर 700 हून अधिक गाड्या या गणेशोत्सव काळातील कोकणवासीयांसाठी इतर प्रवासी वाहतुकीसाठी तैनात करण्यात आली आहे.
या जवळपास पाच हजाराहून अधिक गाड्या मुंबई, पालघर आणि ठाणे येथून कोकणात जाणार असून रायगड विभागाचा देखील जवळपास दोनशे गाड्यांचा सहभाग असणार आहे. तर रायगड जिल्ह्यातील अंतर्गत वाहतुकीसाठी देखील रायगड एसटी महामंडळ पनवेलहून इतर गाड्या प्रवाशांच्या सोयीसाठी नियोजन करणार असल्याची माहिती रायगड विभाग कार्यालयातून मिळाली आहे.
एकंदरीत एसटी महामंडळ गर्दीचा विचार करता किंवा प्रवाशांच्या प्रतिसादाचा विचार करता हजारो फेर्यांचे नियोजन केले आहे. कोकणवासीय गणेशभक्तांच्या सुखकर प्रवासासाठी एसटी महामंडळाने उचललेले हे पाऊल लक्षात घेता कोकणवासी प्रवासी केलेल्या नियोजनाबाबत समाधान व्यक्त करत आहेत.
नियोजित एसटी बसेस
मुंबई-
ग्रुप बुकिंग - 1536
एसटी फेर्या - 267
एकूण फेर्या - 1803
पालघर-
ग्रुप बुकिंग - 535
एसटी फेर्या - 75
एकूण फेर्या - 610
ठाणे-
ग्रुप बुकिंग - 2122
एसटी फेर्या - 435
एकूण फेर्या - 2557
एकूण ग्रुपिंग फेर्या - 4192
एकूण इतर फेर्या - 777
एकूण फेर्या - 4970
दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील आम्ही मुंबईहून आमच्या गावी गणेशोत्सवासाठी एसटीनेच प्रवास करणार आहोत. एसटीचा प्रवास हा आरामदायी आणि खिशाला परवडणारा असतो. यंदा देखील एसटीचे आमच्या कोकणवासीयांसाठी चांगले नियोजन केले आहे याचे समाधान वाटते.
प्रशांत अभ्यंकर, प्रवासी, मुंबई