महाड : चवदार तळे सत्याग्रह निमित्ताने पोलिसांकडून सशस्त्र मानवंदना! | पुढारी

महाड : चवदार तळे सत्याग्रह निमित्ताने पोलिसांकडून सशस्त्र मानवंदना!

महाड; पुढारी वृत्तसेवा : नऊ दशकांपूर्वी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी चवदार तळे येथे सत्याग्रह करून सर्व समाजातील जनतेला येथील पाण्याची सुविधा खुली केली होती. याची आठवण म्हणून आज (दि, २०) राज्य शासनाच्या वतीने महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना रायगड पोलीस दलाकडून सशस्त्र मानवंदना देण्यात आली. ही महाडकरांसाठी ऐतिहासिक दिवस असल्याची भावना आमदार भरत शेठ गोगावले यांनी व्यक्त केली.

महाड शहराच्या ऐतिहासिक चवदार तळे येथे आज (दि. २०) सकाळी दहा वाजता रायगड पोलीस दलातर्फे २१ जवानांनी सशस्त्र बँडसह महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना दिली. याप्रसंगी महाडचे आमदार भरत शेठ गोगावले जिल्हा पोलीस अधीक्षक जिल्हाधिकारी महाडच्या प्रांताधिकारी तहसीलदार यांसह स्थानिक विविध विभागांचे प्रमुख शासकीय अधिकारी तसेच विविध राजकीय पक्षांचे तसेच आंबेडकरी चळवळीतील विविध संघटनांचे प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सशस्त्र मानवंदना देण्यात आल्यानंतर सर्व उपस्थित मान्यवरांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर आमदार भरत शेठ गोगावले  यांनी उपस्थित भीमसैनिकांसमोर आपले मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले की, गेल्या अनेक वर्षांपासून भीमसैनिकांची तसेच डॉक्टर आंबेडकर अनुयायांची असणारी ही मागणी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे पूर्णत्वास जात असल्याबद्दल या दोन्ही मान्यवरांना त्यांनी धन्यवाद दिले.

युगपुरुष भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी चवदार तळे येथे केलेला सत्याग्रह हा अखिल मानव जातीसाठी समता, बंधुता, निर्माण करणार आहे. डॉक्टर बाबासाहेबांची आठवण सदैव राहावी या उद्देशाने गेल्या अनेक वर्षाची भीमसैनिकांची असणारी येथील सशस्त्र मानवंदनीची मागणी पूर्णत्वास आल्याबद्दल त्यांनी शासनाला धन्यवाद देऊन हा दिवस ऐतिहासिक असल्याचे मत व्यक्त केले.

याप्रसंगी जिल्हा पोलीस अधीक्षक जिल्हाधिकारी तसेच महाड रायगड जिल्ह्यासह राज्यातील बहुसंख्य आंबेडकरी संघटनेचे प्रमुख पदाधिकारी, धर्मगुरू स्थानिक प्रशासकीय अधिकारी तसेच विविध राजकीय पक्षांचे प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Back to top button