विरार-अलिबाग कॉरिडॉर महामार्गासाठी ६० हजार कोटींचा निधी मंजूर | पुढारी

विरार-अलिबाग कॉरिडॉर महामार्गासाठी ६० हजार कोटींचा निधी मंजूर

खारघर : सचिन जाधव : विरार अलिबाग या कॉरिडॉर महामार्गासाठी निधी मंजूर झाला आहे. राज्य सरकारने ६० हजार कोटींची घोषणा केली आहे. विरार अलिबाग हा १२७ किमी लांबीचा कॉरिडोर भिवंडी, कल्याण, पनवेल, उरण, पेण, अलिबाग या क्षेत्रातून जात आहे. हा रस्ता जेएनपीटी बंदर, नवी मुंबई विमानतळ आणि शिवडी-न्हावा या ट्रान्सहार्बर लिंकला जोडला जाणार आहे.

या मार्गावरील ८० कीमी अंतरात ५ हजार चारशे सहा झाडे बाधित होत असून हा मार्ग कर्नाळा अभयारण्यातून जात आहे. गेले ११ वर्ष रखडलेल्या  या प्रकल्पाच्या कामाला गती मिळणार आहे. सप्टेंबर २०२३ मध्ये सी लिंक पुर्णत्वास जात आहे. तसेच लगेच नवीमुंबई अंतर राष्ट्रीय विमानतळ पूर्ण होत आहे. त्यामुळे उरणच्या दिशेने जाणारी अवजड वाहतूक ही जेएनपीटी कडून कर्नाळा किल्ल्याचा बाजूला जोडण्यात येणार आहे.

विरार ते अलिबाग बहुद्देशीय महामार्गिकेची लांबी एकूण १२८ किमी आहे. तर १६ मार्गिकेच्या या प्रकल्पातील एक मार्गिका बससाठी राखीव ठेवण्यात येण्याची शक्यता आहे. विरार ते अलिबागदरम्यानच्या अनेक छोट्या मोठ्या गावांना जोडणारा आणि त्यांचा सर्वांगीण विकास साधणारा असा हा मार्ग असेल. तर राष्ट्रीय महामार्ग क्र. ८, ३, ४, ४-ब, १७ भिवंडी बायपास व मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गही या प्रकल्पाने जोडला जाणार आहे. आता जेएनपीटी, मुंबई पारबंदर प्रकल्पालाही ही महामार्गिका जोडली जाणार आहे.

मुंबई ते दिल्ली द्रुतगती मार्गालाही हा प्रकल्प जोडणार आहे. प्रकल्पाचा मूळ खर्च अंदाजे १२ हजार कोटी होता. मात्र प्रकल्प रखडल्याने आता हा खर्च थेट ३९ हजार कोटी रुपयांवर गेला आहे. या प्रकल्पाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या ४८ भुयारी मार्ग आणि ४१ पूल बांधण्यात येणार आहेत. तीन जिल्हयातून जाणार हा महामार्ग १ हजार ३४७ इतके क्षेत्र बाधित होणार आहे. यात ३३१ कुटुंबाचे स्थलांतर होणार आहे.

सरकारी पातळीवर निधीची घोषणा झाली असली तरी अजून प्रत्यक्ष निधी आलेला नाही. एक निविदा प्रसिध्द केल्यानंतर भू संपादन प्रक्रियेला वेग येणार आहे.
– राहुल मुंडके, प्रांत अधिकारी, पनवेल

हेही वाचलंत का ? 

Back to top button