कुटुंबप्रमुखाच्या संमतीने होईल सदस्यांचे ‘आधार’ अपडेट ! | पुढारी

कुटुंबप्रमुखाच्या संमतीने होईल सदस्यांचे 'आधार' अपडेट !

रायगड : पुढारी वृत्तसेवा : आधार कार्ड ऑनलाईन अपडेट करण्यासाठी आता प्रत्येकाच्या पत्त्याच्या पुराव्याची आवश्यकता नाही. कुटुंबप्रमुखाच्या संमतीने त्याचे अपग्रेडेशन होऊ शकणार आहे. याबाबतच्या मार्गदर्शक सूचना ‘यूआयडीएआय’ने जाहीर केल्या आहेत. तसेच आधार कार्ड काढून १० वर्षे झालेल्यांना पुनर्निरीक्षण हे अत्यावश्यक करण्यात आले आहे.

आधार कार्ड हे आता देशातील प्रत्येक नागरिकासाठी महत्त्वाचे ओळखपत्र बनले आहे. आता घराच्या पत्त्याच्या पुराव्याशिवाय आधार कार्ड ऑनलाईन अपडेट करता येणार आहे. त्यासाठी केवळ कुटुंबप्रमुखाच्या संमतीची आवश्यकता असणार आहे, असे भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (यूआयडीएआय) म्हटले आहे. ज्या राहिवाशांना दहा वर्षांपूर्वी आधार कार्डे मिळाली आहेत आणि ज्यांनी या दहा वर्षांत कधीही आधार कार्डे अद्ययावत केली नाहीत, अशा आधार क्रमांक धारकांनी आपली कागदपत्रे अद्ययावत करावीत, असे आवाहन ‘यूआयडीएआय’ने केले आहे.

सर्व रहिवासी आपली ओळख पटवणारी पूरक कागदपत्रे एक तर ‘माय आधार पोर्टल’वर ऑनलाईन स्वरूपात अद्ययावत करू शकतात किंवा आपल्या जवळच्या आधार नोंदणी कार्यालयात जाऊनही अद्ययावत करू शकतात. गेल्या दशकभरात, भारतातील नागरिकांचे आधार कार्ड, हे सर्वत्र ओळखपत्राचा पुरावा म्हणून स्वीकारार्ह झाले आहे. १,१०० पेक्षा अधिक सरकारी योजना आणि कार्यक्रम, ज्यात, ३१९ केंद्र सरकारचे कार्यक्रम / योजनाही समाविष्ट आहेत, त्यात लाभ किंवा सेवा संबंधित व्यक्तीपर्यंत पोहोचवण्यासाठीचा पुरावा म्हणून, आधार कार्ड ग्राह्य धरले जाते. ज्यांच्याकडे आधार कार्डवरील पत्ता अपडेट करण्यासाठी आपल्या रहिवासाच्या स्थानाची ओळख पटवणारी कागदपत्रे नाहीत अशांना कुंटूबप्रमुखांची संमतीने या सेवेचा फायदा घेता येईल.

अचूक प्रमाणीकरण होणार

आधार कार्डमधील कागदपत्रे अद्ययावत ठेवल्याने आपले जीवनमान सुलभ होण्यास, उत्तम सेवा प्रदान करण्यात मदत होते आणि अचूक प्रमाणीकरणदेखील शक्य होते. ‘यूआयडीएआय’ने कायम रहिवाशांना त्यांची कागदपत्रे अद्ययावत ठेवण्यासाठी प्रोत्साहित केले आहे. भारतीय एकल ओळखपत्र प्राधिकरण (यूआयडीएआयने पुन्हा एकदा रहिवाशांना आधार डेटाबेसमधील माहितीच्या अचूकतेसाठी त्यांची कागदपत्रे अद्यायवत करण्याचे आवाहन केले आहे.

अशी असेल आधार कार्ड अपडेट करण्याची प्रक्रिया

आधार कार्डवरील पत्ता बदलण्यासाठी रेशन कार्ड, गुणपत्रिका, विवाह प्रमाणपत्र आदी कागदपत्रांची आवश्यकता आहे. तसेच ज्याचा आधार कार्डवरील पत्ता बदलायचा आहे त्याचे कुटुंबप्रमुखाशी असलेले नाते दर्शवणाऱ्या कागदपत्रांचीदेखील आवश्यकता आहे. ही कागदपत्रे उपलब्ध नसल्यास कुटुंबप्रमुख स्वयंघोषणापत्र सादर करू शकतात. त्यानंतर कुटुंबप्रमुखाद्वारे ओटीपी आधारित प्रमाणीकरण करून ऑनलाईन पत्ता अपडेट करता येईल. आधार कार्डवरील पत्ता अपडेट करण्याची विनंती कुटुंबप्रमुख ३० दिवसांच्या आत स्वीकारू किंवा नाकारू शकतात.

Back to top button