Ashtavinayaka : राज्यातील अष्टविनायक मंदिरांचा जीर्णोद्धार होणार | पुढारी

Ashtavinayaka : राज्यातील अष्टविनायक मंदिरांचा जीर्णोद्धार होणार

अलिबाग; जयंत धुळप : गणेश भक्तांचे अत्यंत आराध्य आणि श्रद्धेय देवस्थान असलेल्या राज्यातील अष्टविनायक (ashtavinayaka) मंदिरांच्या जीर्णोद्धाराची 83 कोटी 10 लाख रुपये खर्चाची योजना आकारास येत असून, यामध्ये रायगड जिल्ह्यातील महड येथील श्री वरदविनायक आणि पाली-सुधागड येथील श्री बल्लाळेश्वर गणेश मंदिर जीर्णोद्धाराकरिता एकूण 28 कोटी 85 लाख रुपयांचा प्रस्ताव शासनास सादर करण्यात आला आहे. प्रत्यक्षात कामास प्रारंभ झाल्यावर त्यात 17 कोटींची भर पडणार असून, राज्यभरातील अष्टविनायकांचा हा निधी 100 कोटींवर जाण्याची शक्यता आहे.

तत्कालीन पर्यटन राज्यमंत्री तथा रायगडच्या तत्कालीन पालकमंत्री आमदार आदिती तटकरे यांनी अष्टविनायक (Ashtavinayaka) मंदिर जीर्णोद्धार योजना आखली होती. त्यास तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 50 कोटींच्या निधीची अर्थसंकल्पात तरतूद केली होती. त्यात वाढ होऊन आता याकरिता 83 कोटी 10 लाख रुपयांचा निधी प्रस्तावित केला आहे.

अष्टविनायक (Ashtavinayaka) गणपतींपैकी दोन गणपती देवस्थाने रायगड जिल्ह्यात आहेत. त्या ठिकाणी मंदिरांचे प्राचिनत्व अबाधित राखून सुशोभीकरण आणि विविध विकासकामे करण्यासाठीची ही योजना आहे. राज्यातील गणेश भक्तांना नव्या वर्षात हा प्रकल्प पूर्ण झाल्य र ाचे पाहायला मिळणे अपेक्षित आहे.

अष्टविनायक गणपती देवस्थानांमध्ये महडचा वरदविनायक आणि पली बल्लाळेश्वर ही गणपती देवस्थान मंदिरे रायगड जिल्ह्यात आहेत. या मंदिर परिसर आणि आसपासच्या परिसरातील रस्ते, स्वच्छतागृहे, विद्युतीकरण, सभागृहे आदी प्रस्तावित विविध विकासकामांना अष्टविनायक मंदिर जीर्णोद्धार योजनेतून मंजुरी मिळाली आहे. त्यासाठी एकूण 28 कोटी 85 लाख रुपयांचा निधी खर्च होणार आहे.
ही योजना अंमलात आणण्याकरिता त्यावेळी तत्कालीन पर्यटन राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी पुरातत्त्व विभाग, पर्यटन विभागासह स्थानिकांना पूर्णपणे विश्वासात घेऊन मंदिर विकासाचा आराखडा तयार केला होता. संबंधित जिल्ह्यांतील खासदार, आमदार आणि स्थानिक ग्रामस्थ, लोकप्रतिनिधींसह देवस्थानचे विश्वस्त, पंचायत समिती सदस्यांच्या सूचना घेऊन प्रांताधिकारी स्तरावर बैठका घेऊन त्या सूचनांचा या आराखड्यात समावेश करण्यात आला आहे.

पालीच्या बल्लाळेश्वर मंदिराची द़ृश्यमानता वाढवणे व प्रवेश अधिक रुंद करणे, पाणपोई व दुकाने, शेजारील इमारती काढून तिथे पायर्‍यांची व दर्शनबारीची व्यवस्था करणे, जेणेकरून रुग्णचिकित्सा केंद्राकडून येणारी वाट रुंद होईल. धुंडी विनायक मंदिराची वास्तुशैली अनुरूप बांधणी, मंदिराच्या दोन्ही बाजूंना लावलेली छते काढून मूळ मंदिराची द़ृश्यमानता वाढवणे. मंदिराचा मंडप व नगारखान्यावरील छताची दुरुस्ती. दर्शन रांग, बसण्यासाठी जागा, फरशा (मंदिर व परिसरात), माहिती फलक, विद्युतीकरण, कुंडाची साफसफाई व दुरुस्ती, नवीन प्रवेश कमान अशी नवीन विकासकामे यात प्रस्तावित असल्याचे आमदार आदिती तटकरे यांनी सांगितले.

31 मार्चपूर्वी निधी मिळणार

अष्टविनायकांच्या मंदिरांशी सुसंगत असे वरदविनायक मंदिराचे बांधकाम प्रस्तावित आहे. या मंदिराचे छत कौलारू असणार आहे. यामध्ये दर्शन रांग, बसण्यासाठी जागा, पदपथ, माहिती फलक, विद्युतीकरण, तळ्याची साफसफाई, दीपमाळ दुरुस्ती आणि स्वच्छता करणे आदी कामे होणार आहेत. सर्व अष्टविनायक मंदिरांचे आराखडे तयार झाले असून, सर्वच देवस्थानांच्या ठिकाणी ही कामे पूर्ण होतील. 31 मार्च 2023 पूर्वी निधी वितरण होणे क्रमप्राप्त असल्याचे माजी पर्यटन राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी
दै. ‘पुढारी’ला सांगितले.

Back to top button