

खारघर : पनवेल महानगरपालिका हद्दीत बांधलेल्या 38 बस थांब्यांचा खर्च दहा कोटीहून अधिक असल्याचे माहिती अधिकारात उघड झाले आहे. एका बस थांब्याचा खर्च 26 ते 27 लाख रुपये असल्याने सारे अचंबित झाले आहेत. या ऐवजी स्वतःची परिवहन बस सेवा सुरू करायला हवी होती असे जाणकारांचे मत आहे.
महानगरपालिका हद्दीत एकूण 38 बस थांबे विकसित करण्यात आले आहेत. हे बस थांबे विकसित करण्याचे कार्यादेश बोरकर पॉलिमर्स यांना देण्यात आले असून प्रति बस थांबा 22 लाख 89 हजार रुपये (जीएसटी वगळून) एवढा खर्च येत आहे. जीएसटी पकडून जवळपास 26 ते 27 लाख रुपये एका बस थांब्याचा खर्च आहे. पनवेल महानगरपालिका होऊन नऊ वर्ष उलटून गेली तरी देखील पनवेल पालिकेची स्वतःची बस सेवा अस्तित्वात नाही. तब्बल दहा कोटी रुपये खर्च करून फक्त 38 बस थांबे पालिका हद्दीत उभारण्यात आले. या ऐवजी पनवेल महानगरपालिकेने स्वतःची परिवहन सेवा सुरू करणे गरजेचे होते. मात्र तसे न करता बस थांब्यावर दहा कोटी रुपये खर्च करण्यात आला. पनवेल पालिकेकडून यासाठी शासकीय निधी प्राप्त झाला होता असे सांगण्यात आले मात्र हा शासकीय निधी इतर ठिकाणी देखील वापरता आला असता. मात्र 38 बस थांब्यावर त्यांची उधळपट्टी करण्यात आली. बस थांबे जरी आकर्षक दिसत असले तरी देखील ते खराब होण्याचीच भीती जास्त आहे.