

अलिबाग ः जलजिवन मिशन कार्यक्रमांतर्गत केलेल्या कामाचे ठेकेदाराचे बील मंजूरीची स्वाक्षरी करण्याकरिता 25 हजार रुपयांची लाच स्विकारता रायगड जिल्हा परिषदेच्या लेखा व वित्त विभागातील कनिष्ठ सहाय्यक आशिष मदन कांबळे, शिपाई दिलीप रामचंद्र कावजी आणि अन्य खासगी व्यक्ती विलास भिकाजी ढेबे या तिघांना रायगड लाचलुतपत प्रतीबंधक विभागाच्या पथकाने कार्यालयातच सापळा रचून शुक्रवारी दुपारी साडेतीन वाजता रंगेहाथ अटक केली आहे.
नमुद वेळी निशांत धनवडे, पोलीस निरीक्षक, अँन्टी करप्शन ब्युरो, रायगड अलिबाग यांनी समक्ष कळविले की, तक्रारदार पेण तालुक्यातील सापोली ग्रामपंचायत हद्दतील मौजे शेणे नळ पाणी पुरवठा योजना ता. पेण च्या जलजिवन मिशन कार्यक्रमा (जेजेएम) अंतर्गत कामाचा ठेका तक्रारदारांना मिळाला होता. तक्रारदार यांच्याकडे रायगड जि.प.च्या वित्त विभागातील शिपाई दिलीप रामचंद्र काबजी(56)याने कशेण नळ पाणी पुरवठा योजनेचे 69 लाखाचे बिल मुख्य वित्त व लेखा अधिकारी यांचेकडून मंजूरीची स्वाक्षरी घेणेकरीता 35 हजार रूपये लाचेची मागणी करून तडजोडीअंती 25 हजार रूपये लाचेची रक्कम स्विकारण्याचे मान्य केल होते. याची तक्रार तक्रारदाराने रायगड लाचलुचपत विभागाकडे केली होती.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून तक्रारीची खातरजमा करुन रायगड लाचलुतपत प्रतीबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक निशांत धनवडे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने, शुक्रवार 22 ऑगस्ट रोजी रायगड जि.प.च्या वित्त विभागात सापळा लावला. यावेळी शिपाई दिलीप रामचंद्र कावजी यांनी तक्रारदाराकडे पुर्वी मागणी केल्याप्रमाणे 25 हजार रूपये लाचेची रक्कम स्विकारून, ती कार्यालयातील कनिष्ठ सहाय्यक आशिष मदन कांबळे यांचेकडे दिली. त्यानंतर कांबळे यांनी रक्कम मोजून एक खासगी व्यक्ती विलास भिकाजी ढेबे यांच्याकडे दिली.
यावेळी शिपाई दिलीप रामचंद्र कावजी, कनिष्ठ सहाय्यक आशिष मदन कांबळे आणि खासगी व्यक्ती विलास भिकाजी ढेबे या तिघांना रंगेहाथ अटक करुन ढेबे यांच्या ताब्यातून सापळा रक्कम 25 हजार रुपये देखील हस्तगत करण्यांत आली आहे. याप्रकरणी अलिबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.