

Shinde Shiv Sena vs NCP
महाड : रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि शिवसेना (एकनाथ शिंदे गट) यांच्यातील राजकीय संघर्ष आता उफाळून आला आहे. अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांच्याविरोधात राष्ट्रवादी प्रवक्ते धनंजय देशमुख यांनी केलेल्या वक्तव्यावरून संतप्त झालेल्या पेण, पाली, सुधागड तालुक्यातील सुमारे 200 ते 250 शिवसैनिकांनी आज महाडमध्ये मोठ्या संख्येने दाखल होत देशमुख यांना थेट आव्हान दिले.
गत आठवड्यात खासदार सुनील तटकरे यांच्या संदर्भातील आमदार दळवी यांच्या वक्तव्यावरून राष्ट्रवादीचे धनंजय देशमुख यांनी प्रतिक्रिया देताना दळवी यांच्या कौटुंबिक बाबींवर भाष्य केले होते. या वक्तव्यामुळे शिवसैनिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली होती.
महाडच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात जमलेल्या शिवसैनिकांनी “राजकारणातील मतभेद असू शकतात, परंतु कौटुंबिक बाबींमध्ये कोणीही हस्तक्षेप करू नये,” असा इशारा दिला. संजय म्हात्रे यांनी सांगितले की, “आम्ही आमदार दळवी यांचे कौटुंबिक सदस्य आहोत. देशमुख यांनी अलिबागला येण्याची गरज नाही — आम्हीच महाड येथे आलो आहोत. त्यांनी येथे येऊन बोलावे. अशा वक्तव्यांची पुनरावृत्ती झाल्यास कठोर पावले उचलू,” असा इशारा त्यांनी दिला.
सुधागड तालुकाप्रमुख अनुपम कुलकर्णी यांनी देखील देशमुख यांच्या वक्तव्याचा निषेध करत म्हटले की, “राजकीय मतभेद मांडताना मर्यादा पाळाव्यात. आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत आणि अशा गोष्टी खपवून घेणार नाही.”
शिवसेना समन्वयक राजेंद्र राऊत यांनी सांगितले की, “आमचे नेते आमदार महेंद्र दळवी, भरत गोगावले आणि महेंद्र थोरवे तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात कोणीही वक्तव्य केल्यास आम्ही शांत बसणार नाही.”
दुपारी साडेबाराच्या सुमारास पेण, पाली, सुधागड येथून २५–३० वाहनांतून आलेले शिवसैनिक छत्रपती शिवाजी महाराज चौकात पोहोचले. त्यांनी छत्रपतींना अभिवादन करून पत्रकारांशी संवाद साधत आपली भूमिका मांडली.
महाड शहर पोलीस निरीक्षक श्री. तडवी यांनी तत्काळ पोलिस बंदोबस्त वाढवून कायदा आणि सुव्यवस्था राखली. आंदोलन शांततेत पार पडले असून शिवसैनिकांनी तूर्तास आपले आंदोलन मागे घेतले आहे.
रायगड जिल्ह्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील वाढता संघर्ष आता टोकाला पोहोचल्याचे या घटनेतून दिसून आले. स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.