

रायगड | देशातील वनक्षेत्रात वाढ झाल्याचे समाधानकारक चित्र समोर आले आहे. महत्त्वाचे म्हणजे वनक्षेत्रामध्ये वाढ होणार्या राज्यांमध्ये महाराष्ट्र तिसर्या क्रमांकावर आहे.
भारताच्या एकूण वनक्षेत्र आणि वृक्षक्षेत्रामध्ये वाढ झाली असल्याचे केंद्र सरकारच्या पाहणी अहवालामध्ये आढळून आले आहे. देशातील जंगल आणि झाडांखालील क्षेत्र 2021च्या तुलनेत 2023 मध्ये 1,445 चौरस किलोमीटरने वाढले असल्याचे भारत वन स्थिती अहवाल (आयएसएफआर) 2023, यामध्ये नमूद करण्यात आले आहे. त्याच वेळी पश्चिम घाट आणि पूर्व घाटातील एकूण वनक्षेत्रामध्ये 58.22 चौरस किलोमीटर घट झाली आहे.
भारत वन स्थिती अहवालातील माहितीनुसार, देशाचे वनक्षेत्र आणि वृक्षक्षेत्र 2021पासून 2023पर्यंत 25.17 टक्क्यांनी वाढले आहे. 2021मध्ये भारताचे एकूण वनक्षेत्र सात लाख 13 हजार 789 चौरस किलीमोटर होते, ते 2023मध्य 7 लाख 15 हजार 343 चौरस किलोमीटर इतके झाले. हे क्षेत्रफळ भारताच्या एकूण भौगोलिक क्षेत्राच्या 21.76 टक्के इतके आहे असे अहवालात म्हटले आहे. या कालावधीत भारतातील वृक्षाखालील क्षेत्र 1,289 चौरस किलोमीटरने तर वनक्षेत्र 156 चौरस किलोमीटरने वाढले. यामध्ये बांबूखालील क्षेत्राचाही समावेश करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.
वनक्षेत्र वाढण्याबरोबरच कार्बन शोषून घेण्याची क्षमता (कार्बन सिक) वाढवण्यातही यश मिळाले आहे. 2005 च्या तुलनेत 2023मध्ये भारतातील 2.25 अब्ज टन कार्बन अधिक शोषला गेला असे ’आयएसएफआर’मध्ये नमूद करण्यात आले आहे. पॅरिस करारात आखून दिलेली ध्येये साध्य करण्यासाठी ’राष्ट्रीय निर्धारित योगदानां’चा (एनडीसी) भाग म्हणून भारताने वन आणि वृक्षक्षेत्र वाढवून 2030 पर्यंत कार्बन सिंक 2.5 ते 3 अब्ज डॉलरपर्यंत वाढवण्यासाठी कटिबद्धता दर्शवली आहे.
याच वेळी 2021च्या कार्बनच्या साठ्याच्या तुलनेत 2023 मध्ये 81.5 टक्के वाढ झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. कार्बन साठा म्हणजे जमीन, झाडांची मुळे आणि जमिनीवरील जीववस्तुमानात (बायोमास) साठवलेले कार्बनचे प्रमाण. आकडेवारीत हे प्रमाण 2023मध्ये 728.55 कोटी टन इतके होते, ते 2030 पर्यंत 31.71 अब्ज टन इतके वाढण्याची शक्यता आहे. छत्तीसगड, उत्तर प्रदेश, ओडिशा आणि राजस्थानमध्ये सर्वाधिक वन आणि वृक्षक्षेत्र वाढले आहे.देशातील आघाडीवर असलेली तीन राज्ये
(एकूण क्षेत्र)
1. मध्य प्रदेश -(85 हजार 724 चौ. किमी)
2. अरुणाचल प्रदेश -(67 हजार 83 चौ. किमी)
3. महाराष्ट्र -(65 हजार 383 चौ. किमी)
’एफएसआय’ उपग्रह ’रिमोट सेन्सिंग डेटा’ आणि क्षेत्र आधारित राष्ट्रीय वन सूची (एनएफआय) च्या आधारे देशातील वन आणि वृक्षांच्या संसाधनांचे सखोल मूल्यांकन करते आणि त्याचे परिणाम ’आयएसएफआर’मध्ये प्रकाशित करते.
भारतीय वन सर्वेक्षणानुसार एक हेक्टर किंवा त्यापेक्षा जास्त क्षेत्र असलेल्या, झाडाच्या छताची घनता 10 टक्क्यांपेक्षा जास्त असलेल्या जमिनीला वनक्षेत्र मानले जाते. त्या जमिनीचा मालकीप्रकार किंवा कायदेशीर स्थिती काय आहे ते विचारात घेतले जात नाही. नैसर्गिक जंगला बरोबरच माणसाने वाढवलेली जंगले, बागा, झाडाखालील जमिनीचे भाग यांचाही समावेश होतो.