

रायगड; पुढारी वृत्तसेवा : एका बाजूला राज्य सरकार मराठीची सक्ती असल्याचे सांगत असताना, दुसर्या बाजूला राज्यातील जवळपास 2,000 शाळा पटसंख्येअभावी बंद होण्याच्या मार्गावर आहेत. यामुळे 25 हजार शिक्षक अतिरिक्त ठरले आहेत. आता त्यातील 620 शाळा बंदचा निर्णय सरकारने घेतला असल्याने राज्यातील जवळपास 70 गावांमध्ये ना शाळा, ना पाटी-पेन्सिल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
कमी पटसंख्येमुळे राज्यातील हजारो मराठी माध्यमाच्या शाळा बंद होण्याच्या मार्गावर असून, अनेक शहरांमध्ये त्यांची संख्या लक्षणीयरीत्या घटली आहे. शालेय शिक्षणमंत्र्यांनी एकही शाळा बंद करणार नाही असे स्पष्ट केले असले, तरी कमी पटसंख्येमुळे अनेक शाळा अडचणीत आल्या आहेत.
राज्यात दहाहून कमी पटसंख्या असलेल्या सुमारे 2,500 हून अधिक मराठी शाळा सध्या पटसंख्येअभावी बंद पडण्याच्या स्थितीत आहेत. या पार्श्वभूमीवर, 14,783 शाळा बंद होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामध्ये कोकण विभागात 700 च्या घरात शाळा (रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे, पालघर या प्रत्येक जिल्ह्यांत सरासरी 150 ते 200 शाळा). विदर्भात 800 हून अधिक शाळा. पश्चिम महाराष्ट्रात 700 हून अधिक शाळा, मराठवाड्यात 400 हून अधिक शाळा, तर उत्तर महाराष्ट्रात 300 हून अधिक शाळा आहेत.