

अलिबाग ः सुवर्णा दिवेकर
वाहनांची वाढलेली वर्दळ, धोकादायक वळणे, रस्त्यांची झालेली दुरवस्था, अनियंत्रित वेग यामुळे रायगड जिल्ह्यातील रस्ते मृत्यूचा सापळा बनले आहेत. रायगड जिल्हा पोलिस हद्दीत दिवसाला जवळपास 2 ते 3 अपघात होत आहेत. 1 जानेवारी ते 30 जून 2025 या 6 महिन्यात जिह्यात 335 अपघात झाले असून, यामध्ये 136 जणांचा मृत्यू तर 413 जण जखमी झाले आहेत. यात सर्वाधिक म्हणजे 55 बळी मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर गेले आहेत.
रायगड जिल्ह्यात मुंबई-गोवा महामार्ग, मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग, मुंबई-पुणे जुना महामार्ग हे तीन प्रमुख महामार्ग जात आहेत. याव्यतिरिक्त जिल्हाभरात विविध महामार्ग, राज्यमार्ग व जिल्हा मार्गांचे जाळे आहे. या मार्गांवर सध्या क्षमतेपेक्षा जास्त वाहतुक सुरु असल्याचे दिसून येत असून, अपघातांच्या प्रमाणातही वाढ झाली आहे.
मुंबई-गोवा महामार्गाच्या कामाची पार दुरवस्था झाली आहे. या कामात ठिकठिकाणी खड्डे, वळण रस्ते यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. अनेकदा डायव्हर्जनच्या फलक लावलेले नसतात, रात्रीच्या अंधारात हे वळण रस्ते चालकांच्या लक्षात येत नाहीत आणि अपघातांना सामोरे जावे लागते. ज्या ठिकाणी रस्त्यांची, उड्डाणपुलांची कामे सुरू आहेत तिथं तर मोठ मोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यातून वाट चुकवताना वाहने एकमेकांसमोर आदळतात आणि अपघात होतात.
अपघात कमी करण्यासाठी वाहतूक विभागामार्फत अनेक प्रयत्न करण्यात येत आहेत. चालकांनी वाहन सावकाश चालवावे यासाठी ठिकठिकाणी पोस्टर लावण्यात आले आहेत. प्रमुख नाक्यांवर वाहतूक पोलिस वाहनचालकांची तपासणी करतात. वाहनचालकांमध्ये जागृती करण्यात येत आहे. वाहतूक नियम मोडणार्या वाहनचालकांवर धडक कारवाई हाती घेतली आहे. एवढे प्रयत्न केल्यानंतर अपघातांची संख्या कमी करण्यात यश मिळाले आले तरी जिल्ह्यात आजही मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत. मागील सहा महिन्यात जिल्ह्यात 335 अपघात झाले असून, यामध्ये 136 जणांचा मृत्यू झाला आहे.
अपघातांची कारणमीमांसा
1) महामार्गांची संपूर्ण माहिती नसताना वेगाने वाहन चालवणे.
2) रस्त्यालगत इंडिकेटर न लावता थांबलेली वाहने.
3) रस्त्यावरील खड्डे चुकवण्याचा प्रयत्न करणे.
4) कोणतीही पूर्वकल्पना न देता वाहन दुसर्या बाजूला नेणे.
5) दारू पिऊन वाहन चालवणे
6) धोकादायक वळणे.
मुंबई गोवा महामार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. काम सुरू असताना ज्या उपाय योजना करणे आवश्यक असते त्या केल्या जात नाहीत. ठेकेदार किंवा महामार्ग विभागाच्या हलगर्जीचा फटका प्रवाशांना बसतो. अपघात होतात अनेकदा प्रवाशांचा बळी जातो. आता हयगय करणार्यांची गय केली जाणार नाही. जे कुणी जबाबदार असतील त्यांच्यावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्याच्या सक्त सूचना दिल्या आहेत.
डॉ. किशन जावळे, जिल्हाधिकारी
सध्या रस्ते अपघातांचे प्रमाण वाढले आहे.याचे मुख्य कारण म्हणजे अतिवेगाने वाहन चालवणे. यामुळे आपण आपल्या सोबत इतरांचाही जीव धोक्यात घालत आहोत.याची जाणीवच वाहनचालकांना नसते. वाहतूकीच्या नियमांचे उल्लंघन केल्यास काय कारवाई किंवा दंड होवू शकतो याबाबत जनजागृती केली जात आहे. ठिकठिकाणी वाहतूक पोलीस तैनात ठेवले आहेत.
अभिजीत भुजबळ, पोलीस निरीक्षक, जिल्हा वाहतूक शाखा