महाडमध्ये विजयाची हॅट्रिक करणारे आ. भरत गोगावले विरुद्ध उद्धव ठाकरे गटाच्या महाडच्या माजी नगराध्यक्ष स्नेहल जगताप यांच्यामध्ये होणार्या लढतीकडे तमाम राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. ही लढत जगताप कुटुंबीयांसाठी राजकीय अस्तित्वाची तर विद्यमान आ. भरत गोगावले यांच्यासाठी राजकीय प्रतिष्ठेची झाली असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
मागील 25 वर्षाचा महाडमध्ये 980 व 2004 या दोन वेळा काँग्रेस पक्षाने येथे विजयश्री संपादन केली आहे. 1980 मध्ये स्वर्गवासी चंद्रकांत देशमुख तर 2004 मध्ये स्वर्गवासी माणिकराव जगताप यांनी सलग तीन वेळा निवडून आलेल्या शिवसेनेच्या प्रभाकर मोरे यांचा चुरशीच्या लढाईत पराभव केला होता. त्यानंतर सलग तीन वेळा जगताप यांना शिवसेनेच्या भरत गोगावले यांच्यासमोर पराभवाला सामोरे जावे लागले.
महाडच्या राजकीय इतिहासामध्ये यापूर्वी दोन वेळा हॅट्रिक नोंदविल्याची घटना स्मरून जाते, यामध्ये क्रांतिसिंह नानासाहेब पुरोहित व स्वर्गवासी प्रभाकर मोरे यांचा समावेश आहे. विद्यमान आ. भरत गोगावले यांनी देखील सलग तीन वेळा विधानसभेमध्ये विजय संपादन करून आता 2024 या निवडणुकीसाठी विजय चौकार मारण्याकरिता ते सिद्ध झाले आहेत. मात्र मागील तीन वेळच्या झालेल्या पराभवाचा राजकीय बदला घेण्यासाठी उद्धव ठाकरे गटाच्या माध्यमातून निवडणूक लढवणार्या महाडच्या माजी नगराध्यक्ष स्नेहल जगताप यांनी निर्माण केलेले कडवे आव्हान त्यांना परतवून लावावे लागणार आहे.
आ. गोगावले यांच्या पंधरा वर्षातील पहिल्या 13 वर्षापेक्षा उर्वरित दोन वर्षात राज्यात शिंदे सरकार अस्तित्वात आल्यानंतर महाड विधानसभेमधील प्रलंबित कामे गतिमान पद्धतीने मार्गी लावण्यात प्राप्त झालेले यश व त्यासाठी शासनाकडून मंजूर झालेला सुमारे 3000 कोटी रुपयांपेक्षा निधी नागरिकांसाठी त्यांच्या विकासाचा अनुशेष भरून काढणारा ठरेल असा विश्वास समर्थकांकडून व्यक्त होत आहे.
महाडच्या माजी नगराध्यक्षा म्हणून कार्य केलेल्या स्नेहल जगताप यांनी आपल्या कुटुंबावर जुलै 2021 मध्ये माणिक जगताप यांच्या निधनाने झालेल्या आघातानंतरही 24 तासात महाप्रलयात सापडलेल्या महाडकर नागरिकांच्या समस्या पूर्ततेसाठी पदर खोचून रस्त्यावर उतरल्याचे चित्र महाडची जनता विसरलेली नाही. नगर परिषदेच्या स्वमालकीच्या इमारतीची निर्मिती यासह नागरिकांचे विमा योजना, न.प.मध्ये सुरू करण्यात आलेले राष्ट्रगीत तसेच स्वच्छता अभियान व त्यासाठी शासनाकडून तीन वेळा पाच कोटी रुपयांपेक्षा जास्त झालेला निधी हा स्नेहल जगताप यांच्या कार्यकाळातील सर्वोत्तम कामगिरीचा आलेख असल्याचा दावा उद्धव ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून प्रचारादरम्यान करण्यात येत आहे.
महाड विधानसभा मतदार संघात गेल्या काही वर्षात माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या महाड, सह पोलादपूर मध्ये तसेच आदित्य ठाकरे यांचा झालेला दौरा व त्यांना मिळणार पाठींबा लक्षात घेता आगामी विधानसभा निवडणुकीत स्नेहल जगताप याच्या रूपाने महिला आमदार निवडून येईल असा दावा या पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे.
मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे विराजमान झाल्यावर 3000 कोटी पेक्षा जास्त निधी दिल्याने या मतदान संघातील अनेक धरणाच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. याच प्रमाणे महाड पोलादपूर मधील 11 मंदिराचे जीर्णोद्धारासह, रस्ते, सभा मंडप सह इतर कामे करण्यात आली आहे.
महाड विधानसभेवर 1952 व 57 मध्ये प्रजा समाजवादी तर 1972 आणि 78 मध्ये जनता पक्षाकडून नानासाहेब पुरोहित हे चार वेळा आमदार म्हणून निवडून आले. तर 1962 मध्ये काँग्रेसचे शंकर बाबाजी सावंत आमदार झाले. तसेच 1967 मध्ये देखील त्यांनी बाजी मारली. नंतर 1980 मध्ये चंद्रकांत देशमुख हे आमदार झाले, त्यानंतर 1985 मध्ये जनता पार्टीचे शांताराम भाऊ फिलसे यांनी अॅड. सुधाकर सावंत यांना अवघ्या 649 मतांवर पाडून निवडून आले. तर 1990 मध्ये शिवसेनेचे प्रभाकर मोरे 3 हजार 110 मतांनी अॅड. सुधाकर सावंत यांना पाडून विजयी झाले.
प्रभाकर मोरे यांनी देखील हॅट्ट्रिक साधत तीन वेळा या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले, मात्र 2004 मध्ये प्रभाकर मोरे यांचा माणिक जगताप यांनी 3 हजार 779 मतांनी पराभव केला. त्यानंतर 2009 मध्ये शिवसेनेचे भरत गोगावले यांनी 14 हजार 50 मतांची आघाडी घेऊन माणिक जगताप यांच्यावर विजय मिळवला, तर 2014 मध्ये पुन्हा भरत गोगावले व माणिक जगताप यांच्यात झालेल्या लढतीत गोगावले यांना 94 हजार 194 तर जगताप यांना 72 हजार 938 मते पडल्याने सुमारे 21 हजार 256 मतांची भरघोष आघाडी घेऊन गोगावले यांनी विजय मिळविला. 2019 च्या भरत गोगावले व माणिक जगताप यांच्यात झालेल्या लढतीत गोगावले यांना 1 लाख 2 हजार 273 तर जगताप यांना 80 हजार 698 मते पडल्याने सुमारे 21 हजार 575 मतांनी गोगावले यांनी आघाडी घेत विजयाची हट्रिक मिळवली होती.
सलग तिसर्या गोगावले आमदार झाल्या वर मंत्रिपद मिळणार याची चर्चा रंगू लागली होती. मंत्रिमंडळाचा विस्तारमध्ये सातत्याने हुलकावणी मिळत राहिली मात्र विकासाचा ओघ कायम राहिला असला तरी मंत्री पद पासून दूर रहावे लागले असे असताना शेवटच्या टप्यात आ. गोगावले यांना एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
उबाठा शिवसेनेतर्फे स्नेहल माणिक जगताप याची उमेदवारी जाहीर झाली आहे व त्यां महाड मतदारसंघात सक्रिय झाल्या असून यामुळे जगताप कुटुंबीयांची राजकीय अस्तित्वता पणाला लागले असून विद्यमान आमदारांना विजयी चौकार मारण्यासाठी आवश्यक असलेली ताकद दोन वर्षात प्राप्त झाल्याने महाडमध्ये पुन्हा नवा इतिहास लिहिला जाणार का याकडे महाडसह राज्यातील जनतेचे लक्ष लागले आहे.