साहित्यातील स्त्रियांचे योगदान दुर्लक्षितच : डॉ. अरुणा ढेरे यांचे प्रतिपादन

साहित्यातील स्त्रियांचे योगदान दुर्लक्षितच : डॉ. अरुणा ढेरे यांचे प्रतिपादन

पुणे : पुढारी वृत्तसेवा : स्त्रियांच्या वाटचालीत स्त्रिया ज्ञानोपासनेपासून वंचित ठेवल्या गेल्या. पुरुषसत्ताक मानसिकतेने स्त्रियांचे जीवन मर्यादित आणि त्यांचे अनुभवविश्व खुंटित केले. असे असले तरी स्त्री अडाणी नव्हती, तर ती प्रतिभावंत आणि बुद्धिवंत होती. त्याची चमक परंपरेचा शोध घेतला तर आपल्याला बर्‍याच ठिकाणी सापडते. तिची प्रतिभा, तिची बुद्धिमत्ता, जगण्याविषयीचे शहाणपण असलेली स्त्री अस्तित्वात होती, फक्त ती इतिहासात आली नाही. कारण, स्त्रियांच्या या प्रतिभेचे दस्तऐवजीकरण झाले नाही. त्यामुळे मध्ययुगीन काळात साहित्यातील स्त्रियांचे योगदान अंधारात राहिले, असे प्रतिपादन ज्येष्ठ लेखिका-कवयित्री डॉ. अरुणा ढेरे यांनी रविवारी केले.

'आम्ही सिद्ध लेखिका'च्या पुणे विभागातर्फे आयोजित दुसर्‍या राज्यस्तरीय महिला साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून त्या बोलत होत्या. या संमेलनाचे उद्घाटन संस्थेच्या ठाणे जिल्हा विश्वस्त उषा चांदुरकर यांच्या हस्ते झाले. पुणे विभागाच्या अध्यक्षा ज्योत्स्ना चांदगुडे, डॉ. वैशाली मोहिते, पुणे विभागाच्या उपाध्यक्षा मीना शिंदे, संमेलनाच्या स्वागताध्यक्षा अ‍ॅड. प्रार्थना सदावर्ते, पद्मा हुशिंग, वैशाली राजे आदी उपस्थित होत्या. डॉ. ढेरे म्हणाल्या, साहित्यापासून विविध क्षेत्रांत स्त्रिया त्यांच्या क्षमता सिद्ध करीत असताना स्त्रियांना कुठे आवड-निवड असते का? अशी मानसिकता बाळगणारा स्त्रीसमूह महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात आजही दिसून येतो.

ही तफावत आणि ही विषमता दूर करण्यासाठी स्त्री साहित्यिकांनी लिहिते राहिले पाहिजे. त्यादृष्टीने अजून बराच मोठा पल्ला गाठायचा आहे. विसाव्या शतकाच्या तुलनेत 21 व्या शतकात स्त्री साहित्याचा विद्रोहाचा सूर संयत झाला आहे. स्त्रियांच्या लेखनातील शब्द आता बदलत आहेत. संतपरंपरा आणि लोकपरंपरेत स्त्रीच्या या प्रतिभेचे दर्शन झाल्याचे आपल्याला दिसून येते. चांदुरकर म्हणाल्या की, माध्यमांमध्ये झालेली क्रांती आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळांकडे पालकांचा वाढता कल, या दोन संकटांमुळे मराठी साहित्यावर विपरीत परिणाम झाला असून, त्याविषयी उदासीनता निर्माण झाली आहे. जोपर्यंत पालक जाणीवपूर्वक मुलांना मराठी भाषेची गोडी लावणार नाहीत तोपर्यंत मुलांच्या मराठी भाषेच्या जाणिवा विस्तारणार नाहीत. मराठी भाषेला अभिजात दर्जा लाभेल, याविषयी माझ्या मनात अजिबात शंका नाही. चिन्मयी चिटणीस यांनी सूत्रसंचालन केले. या एकदिवसीय संमेलनात परिसंवाद, प्रकट मुलाखत, काव्यसंमेलन आणि गझल मुशायरा, अशा वैविध्यपूर्ण कार्यक्रमांची पर्वणी रसिकांना मिळाली.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news