मुंबईत बहुमजली कारागृह मियामी शिकोगोच्या धर्तीवर बांधण्यात येणार

Published on

पुणे; पुढारी वृत्तसेवा : मियामी आणि शिकागो येथील कारागृह जसे आहे त्या धर्तीवर मुंबईतील चेंबुरमध्ये बहुमजली कारागृह बांधण्यात येणार आहे. हे कारागृह महिला बाल कल्याण विभागाच्या जागेवर बांधण्यात येणार आहे. यामुळे मुंबईतील आर्थररोड कारागृहावरील ताण कमी होण्यास मदत होणार असल्याची माहिती कारागृहाचे अतिरिक्त महासंचालक सुनील रामनंद यांनी पत्रकार परिषदेत दिली.

कारागृहाची क्षमता वाढविण्याची सध्या गरज आहे. गेल्या दहा वर्षात कारागृहातील संख्या २४ हजारांपासून ती ३७ हजारांपर्यंत वाढली आहे. कोरोनामुळे पॅरोल आणि जामीनावर १३ कैदी आणि बंदीवान बाहेर आहे. तशी ही संख्या सुमारे ४५ हजारावर गेली आहे. अशात हे बंदी परत आले तर आपण ठेवणार कोठे? कारागृहात क्षमतेपेक्षा १८० टक्के कैदी अधिक होतील.

म्हणूनच या भेडसावणार्‍या प्रश्नावर आता येरवडा कारागृहात पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशीपखाली काही करता येईल का? हे सध्या विचारधीन आहे. तसे झाले तर पुण्यात पाच हजार क्षमतेचे कारागृह बांधता येऊ शकत असल्याचे रामनंद म्हणाले.

त्याबरोबर पालघर, गोंदीया, पुणे येथे कारागृहासाठी प्रस्ताव शासनाकडे देण्यात आले असून शासन यासाठी नेमका निधी देणार की, पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपचा वापर करणार हे पहावे लागणार असल्याचेही ते म्हणाले.

५३ कैद्यांना पॅरोल घेण्यास नकार

कोरोना कालावधीत कैद्यांना पॅरोल देण्याची सुविधा उपलब्ध असताना असे ५३ कैदी कारागृहात आहेत, की त्यांना पॅरोल नको असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्यांनी कारागृहात मिळत असलेल्या वैद्यकीय सुविधांवर समाधान व्यक्त केले आहे.

१३ हजार कैदी पॅरोल जामीनवार बाहेर

उच्च न्यायालयाकडून एका न्यायानिवाड्यात महाराष्ट्र कारागृह प्रशासनाने कोरोनाच्या उपाय योजनाबद्दल समाधान व्यक्त केल्याचे रामनंद म्हणाले. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हायपावर समिती नेमण्यात आली होती.

त्या समितीला दिलेल्या मार्गदर्शक सुचना नुसार १३ हजार ११५ कैदी पॅरोल आणि जामिनावर सोडले आहेत. तर राज्यातील विविध कारागृहातील कच्च्या पक्क्या अशा ३ हजार ३३८ कैद्यांना कोरोनाची लस देण्यात आली आहे.

तर १ हजार २१ कैद्यांना कोरोनाची लस देण्यात आली आहे.

राज्यातील कारागृहांत रेस्टॉरंटच्या धर्तीवर खाद्यपदार्थ

राज्यांतील कारागृहात आता रेस्टॉरंटच्या धर्तीवर खाद्यपदार्थांची रेलचेल असणार आहे. हे खाद्यपदार्थ बंद्यांना कँटीनमधून खरेदी करता येणार आहेत.

पूर्वी मिळत असलेल्या खाद्यपदार्थांच्या संख्येत वाढ करत काही चविष्ठ व मागणी असलेल्या खाद्यपदार्थांचा समावेश करण्यात आला आहे. इतकेच नव्हे तर कैद्यांना हेअर प्रोडक्टही उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.अंडी, दुध, बेकरी उत्पादने कारागृहांतील कँटीनमध्ये उपलब्ध होती. या खाद्यपदार्थांमध्ये वाढ करण्यात आली असून रेडी टु इट प्रोडक्टचाही समावेश करण्यात आला आहे.

तसेच मासे, चिकण, मिठाई, सोन पापडी, ड्रायफ्रुट, कचोरी, समोसा, पनीर, विविध प्रकारचे ज्यूस, अंडा करी, मिनरल वॉटर, फळे, शुध्द तूप आदी पदार्थांचा नव्याने समावेश करण्यात आला आहे.करोना काळात कैद्यांना प्रोटीन आणि व्हिटामिन असलेला डाएट देण्यात येत आहे.

कारागृहातील ४ हजार ६० कैद्यांना आतापर्यंत कोरोनाची लागण

राज्यातील कारागृहातील कैद्यांच्या ४ हजार ६० जणांना कोरोना झाला. त्यातील ३ हजार ९३३ जण कोरोनातून बरे झाले आहेत. तर सध्या ११४ सध्या उपचार घेत असून १३ जणांचा मृत्यू झाला. कारागृहातील ९१८ कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळले. त्यातील ८५९ जण कर्मचारी व अधिकारी बरे झाले. तर ९ कर्मचार्‍यांचा मृत्यू झाला तर ५० जण सध्या उपचार घेत आहेत.

सध्या कारागृह पर्यटन कोरोनामुळे बंद आहे. राज्यातील कारागृहांना त्यांचा वेगळा इतिहास आहे. त्याच धर्तीवरही कारागृहे विद्यार्थ्यांना अभ्यासाठी महत्वाची ठरणार आहेत. त्यामुळे कारागृह पर्यटनाला उभारी मिळण्यास मदत होणार असल्याचे रामानंद म्हणाले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news