घरातील व्यक्ती म्हातारी झाली की तरुणांच्या हाती कारभार द्यायचा : अजित पवार

घरातील व्यक्ती म्हातारी झाली की तरुणांच्या हाती कारभार द्यायचा : अजित पवार

यवत : पुढारी वृत्तसेवा : लोकसभेची ही निवडणूक देशाला वेगळी दिशा देणारी निवडणूक आहे, म्हणून बारामती लोकसभेतील महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांना विजयी करण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. बारामती लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारार्थ दौंड तालुक्यातील केडगाव चौफुला येथे झालेल्या भाजपच्या कार्यकर्ता आणि पदाधिकारी मेळाव्यात अजित पवार बोलत होते.

अजित पवार पुढे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाचा सर्वांगीण विकास करण्याच्या हेतूने गेली दहा वर्षे वाटचाल सुरू केली आहे आणि आपणा सर्वांना बारामती लोकसभेतून मोदी यांना मदत करण्यासाठी महायुतीचे उमेदवाराला दिल्लीला पाठवायचे आहे. मोदी हे भारताची अर्थव्यवस्था जागतिक स्तरावर उंचावण्यासाठी प्रयत्न करत आहेत. जम्मू-काश्मीर भागातील 370 कलम हटवणे, राम मंदिर बांधणे यासारखे धडाकेबाज निर्णय पंतप्रधान मोदी यांनी घेतले आहेत, म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने महायुती सोबत जाण्याचा निर्णय घेतला. राजकारणात कुणीही कुणाचा कायमचा शत्रू नसतो, असे सांगत त्यांनी भाजपाबरोबर गेलेल्या नितीश कुमार आणि ममता बॅनर्जी यांचा दाखला उपस्थितांना दिला.

घरातील व्यक्ती म्हातारी झाल्यानंतर तरुणांच्या हाती कारभार द्यायचा असतो, असे सांगत आजपर्यंत शरद पवारांनी जे निर्णय घेतले त्या सर्व निर्णयात मी शरद पवार यांच्यासोबत राहिलो असल्याचे अजित पवार यांनी सांगितले. तसेच माझ्या लग्नाला चाळीस वर्षे पूर्ण झाली तरीही ते सुनेत्रा पवार यांना अजून पवार मानण्यास तयार नसल्याचे सांगत आता सासूचे दिवस संपले असून सुनेचे दिवस आले आहेत, याची आठवण अजित पवार यांनी शरद पवार यांना करून दिली. या वेळी अजित पवारांनी सुप्रिया सुळे यांच्यावरदेखील जोरदार टीका केली. निवडणुका झाल्यानंतर परदेशात फिरायला जाणार्‍यांना मतदान न करता, कायम जनतेत असणार्‍यांना मतदान करा, तसेच संसदेत बोलणारा नव्हे तर लोकसभा मतदारसंघाचा विकास करणारा उमेदवार विजयी करा, असे सांगत त्यांनी दौंडचे आमदार राहुल कुल यांच्या कामाचे कौतुक केले.

यापुढे दौंड तालुक्यातील विकासकामांमध्ये राहुल कुल यांना कायम सहकार्य करणार असल्याचे सांगत त्यांनी, कार्यकर्त्यांनी पाठीमागील काळात जे झाले गेले विसरून जा, आता नव्याने सुरुवात करू, असे सांगितले. दौंड तालुक्यात लवकरच शैक्षणिक संकुल काढण्यात येणार असल्याची घोषणाही अजित पवार यांनी या वेळी केली. अजित पवार यांचे भाषण सुरू असताना काही कार्यकर्त्यांनी भविष्यात राहुल कुल यांना कॅबिनेट मंत्री करा, अशी मागणी केली. त्यावर अजित पवार यांनी राहुल कुल राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आले तर त्यांना नक्की कॅबिनेट मंत्री करतो, असे सांगितले. इंदापूर तालुक्यातील राजकारणावर बोलताना ते म्हणाले, हर्षवर्धन पाटील, दत्तात्रय भरणे आणि मी एकत्रितपणे पुढील काळात काम करणार असून आम्ही एकमेकांचा बांध रेटला नाही. राजकीय मतभेद असतात ते विसरून पुढे काम करायचे असते, असेही पवार या वेळी म्हणाले.

भाजपा आमदार राहुल कुल यांनी केलेल्या दौंड तालुक्यातील विकासकामांमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांचे मोठे योगदान असून महायुतीचा शब्द भाजपाचे कार्यकर्ते पाळणारा असल्याचे सांगितले. या वेळी ज्येष्ठ नेते नंदू पवार, दौंडचे माजी नगराध्यक्ष प्रेमसुख कटारिया, भाजपचे जिल्हाध्यक्ष वासुदेव काळे यांनी मनोगत व्यक्त केले तर कांचन कुल, धनाजी शेळके, राहुल शेवाळे, मंगलदास बांदल, नामदेव बारवकर, गणेश जगदाळे व इतर मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बापू भागवत यांनी केले, आभार गोरख दिवेकर यांनी मानले.

राहुल कुल यांना अश्रू अनावर

मेळाव्याच्या दरम्यान भाषणाच्या सुरुवातीलाच आमदार राहुल कुल यांनी त्यांचे वडील स्वर्गीय आमदार सुभाषअण्णा कुल यांच्या कार्याची आठवण काढली, या वेळी कुल यांना अश्रू अनावर झाले, या वेळी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी कुल यांचे सांत्वन केले. उपस्थितांनी पहिल्यांदाच आमदार राहुल कुल यांना भावुक होताना पाहिले.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news