

खडकवासला: सिंहगड रस्त्यावरील किरकटवाडी येथे डंपरखाली झोपलेल्या देवानंद मुरगुत्ते (वय 25, रा. आंबेडकर भवन जवळ, किरकटवाडी) याचा डंपरखाली चिरडून मृत्यू झाला आहे. सीसीटीव्ही कॅमेराच्या फुटेजच्या अधारे नांदेड सिटी पोलिसांनी तपास करून सहा तासांत हा गुन्हा उघडकीस आणला.
याप्रकरणी डंपरचालक संदीप धनवटे (वय 33, रा. किरकटवाडी) याला पोलिसांनी अटक केली आहे. तसेच डंपर पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. किरकटवाडी येथील हॉटेल स्वागतजवळील नाल्यात देवानंद सुरेश मुरगुत्ते हा गंभीर जखमी अवस्थेत पडला असल्याची माहिती नांदेड सिटी पोलिसांना मिळाली. त्याच्या तोंडावर व शरीरावर गंभीर जखमा असल्याने हा घातपाताचा प्रकार असल्याचा संशय पोलिसांना आला. त्यामुळे त्यांनी या प्रकाराची चौकशी सुरू केली.
पोलिस उपायुक्त संभाजी कदम, सहायक पोलिस आयुक्त अजय परमार यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड सिटी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अतुल भोस, पोलिस उपनिरीक्षक शिवाजी बुनगे, पोलिस अंमलदार एच. डी. कुलथे, सी. सी. क्षीरसागर आदींनी घटनास्थळी धाव घेतली.
भोस म्हणाले की, मयत देवानंद मुरगुत्ते हा रस्त्यावर उभ्या असलेल्या डंपरखाली झोपला होता. डंपरचालक धनवटे हा डंपर चालू करून निघून गेला. त्या वेळी डंपरचे चाक मुरगुत्ते याच्या डोक्यावरून गेल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे या गुन्ह्याचा तपास करण्यात आला.