

वाल्हे: रक्षाबंधनासाठी बहिणीकडे जाऊन परतत असताना झालेल्या दुचाकी अपघातात तरुणाचा मृत्यू झाला आहे. गणेश बाळासाहेब पवार (वय 24, रा. अंबाजीचीवाडी, ता. पुरंदर) असे अपघातात मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. हा अपघात जुनी जेजुरी-कोळविहिरे (ता. पुरंदर) मार्गावरील परिसरात शनिवारी रात्री साडेनऊच्या सुमारास घडला.
गणेश पवार वाल्हे येथील अंबाजीचीवाडी येथून बारामतीमधील आपल्या आत्येबहिणीकडे रक्षाबंधनासाठी गेला होता. बहिणीने भावाला औक्षण करून राखी बांधली. त्यानंतर रात्री गणेश दुचाकीवरून घरी परतत होता. तो मोरगावमार्गे येत असताना जुनी जेजुरी-कोळविहिरे रस्त्यावरील गतिरोधकावरून त्याची दुचाकी घसरली. यामुळे तो रस्त्यावर आदळला आणि डोक्याला गंभीर मार लागून जखमी झाला. (Latest Pune News)
अपघातानंतर घटनास्थळी जमा झालेल्या नागरिकांनी त्याला तत्काळ जवळील रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचार सुरू होण्याआधीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. गणेश पवार हा अत्यंत शांत स्वभावाचा, कुटुंबवत्सल आणि जबाबदार तरुण म्हणून ओळखला जात होता.
त्याच्या पश्चात आई-वडील, दोन आत्या आणि आजी असा परिवार आहे. त्याच्या अचानक जाण्याने संपूर्ण पवार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.गणेशचा मृत्यू रस्त्याच्या खराब स्थितीमुळे झाल्याचे बोलले जात आहे. स्थानिक नागरिकांनी संबंधित प्रशासनाकडे वारंवार तक्रार करूनही रस्त्याच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष केले आहे. संबंधित विभागाच्या विरोधात मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे.
रस्त्यावर खड्डेच खड्डे
जेजुरी-कोळविहिरे रस्त्याचे काम नुकतेच करण्यात आले असले तरी रस्त्याची मोठी दुरवस्था झाली आहे. या रस्त्यावर खडी, वाळू आदी अवजड वाहनांची सतत वाहतूक सुरू असते. पावसाने रस्त्यावर जागोजागी उंचवटे तयार झाले आहेत. अनेक ठिकाणी डांबर गायब झाले असून, मोठे खड्डे पडले आहेत. पाच ते सहा ठिकाणी रस्ता उखडला आहे. रस्त्याच्या कडेने पाणी वाहून जाण्यासाठी गटारांची व्यवस्था नाही. त्यामुळे या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.