

पुणे: शुश्रूषेसाठी ठेवलेल्या तरुणाने ज्येष्ठाला दोरीने बांधून चाकूच्या धाकाने त्यांच्याकडील रोकड आणि मोबाईल लुटून नेल्याची घटना कोरेगाव पार्क भागात घडली. याप्रकरणी पसार झालेल्या तरुणाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
चिंटू चतुर्वेदी (वय 19) असे गुन्हा दाखल केलेल्याचे नाव आहे. याबाबत एका व्यावसायिकाने कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व्यावसायिक घोरपडीतील सोपानबाग परिसरात राहायला आहेत. त्यांचे वडील कोरेगाव पार्क भागातील अग्रसेन सोसायटीत राहायला आहेत.
त्यांची शुश्रूषा करण्यासाठी आरोपी चतुर्वेदी याला ठेवले होते. बुधवारी (दि.1 जानेवारी) ज्येष्ठाला चाकूचा धाक दाखविला. पैसे न दिल्यास जिवे मारण्याची धमकी दिली. त्यांच्याकडील 32 हजारांची रोकड आणि मोबाईल त्याने काढून घेतला. त्यांचे हात दोरीने बांधले आणि ऐवज लुटून चोरटा पसार झाला. सायंकाळी व्यावसायिक वडिलांची विचारपूस करण्यासाठी घरी गेले. तेव्हा शुश्रूषेसाठी ठेवलेल्या चतुर्वेदीने वडिलांना चाकूच्या धाकाने लुटल्याचे उघडकीस आले. पसार झालेल्या आरोपीचा शोध घेण्यात येत आहे.
शुश्रूषेसाठी ठेवलेल्या कामगाराने यापूर्वी शहरात चोरी, तसेच ज्येष्ठांना लुटल्याच्या घटना घडल्या आहेत. कामावर ठेवलेल्या कामगाराचे नाव, पत्ता, तसेच कागदपत्रांची पडताळणी करण्यात यावी, अशा सूचना पोलिसांनी दिल्या होत्या.