

पुणे: हातउसने दिलेल्या पैशांच्या कारणातून झालेल्या वादात तरुणाला बेदम मारहाण केल्याने त्याचा मृत्यू झाला. तरुणाच्या खूनप्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी एकाला अटक केली. नवी पेठेतील राजेंद्रनगर झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या (एसआरए) वसाहतीत ही घटना घडली. आनंद परमेश्वर डोलारे (वय 30) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.
चार दिवसापासून आनंद याच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू होते. 9 जानेवारी रोजी त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले अशी माहिती पोलीस उपनिरीक्षक प्रदीप खाडे यांनी दिली. याप्रकरणी मन्या सोनावणे याला अटक करण्यात आली आहे. याबाबत आनंद डोलारेची आई वनिता परमेश्वर डोलारे (वय 57) यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आनंद याला दारूचे व्यसन आहे. 5 जानेवारी रोजी तो कामावरून रात्री घरी आला. दारू पिऊन तो वसाहतीच्या परिसरात थांबला होता. त्या वेळी आरोपी मन्या याने आनंदला हातउसने पैसे दिले होते. त्याने आरोपीला पैसे दिले नव्हते. त्यामुळे तो त्याच्यावर चिडला होता.
रात्री साडेआठच्या सुमारास आनंद वसाहतीत थांबला होता. त्यावेळी मन्या तेथे आला. हातउसने दिलेल्या पैशांवरून दोघांमध्ये वाद झाला. आरोपीने त्याला दांडक्याने बेदम मारहाण केली. आरोपीने आनंदला उचलून जमिनीवर आपटल्याने त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.
गंभीर जखमी झालेल्या आनंदला रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, याबाबत खुनाचा गुन्हा दाखल करून आरोपी मन्याला अटक करण्यात आली असून, पोलीस उपनिरीक्षक प्रदीप खाडे तपास करत आहेत.