
नारायणगाव: जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील आणे येथील किरण दाते या युवा शेतकऱ्यावर बिबट्याने हल्ला केला असून त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्याला उपचारासाठी नारायणगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.
आणे येथील किरण तुळशीराम दाते (वय २५) हे आपल्या शेतातील मका पिकाला शनिवारी (दि. ५) दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास पाणी भरीत होते. यावेळी मक्याचा वाफा पूर्ण भरलाय का हे पाहायला जात असताना दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक हल्ला करून किरण दाते यांच्या अंगावर झडप घेऊन डोक्याला गंभीर दुखापत केले. दरम्यान किरण दाते यांच्या हातामध्ये फावडे असल्यामुळे ते बिबट्याच्या हल्ल्यातून वाचले.
बिबट्याचा हल्ला झाल्यावर किरण दाते मका पिकाच्या बाहेर आले व माझ्यावर बिबट्याने हल्ला केलाय असे म्हणतआरडाओरड केला. त्यांचा आरडाओरडा ऐकून प्रशांत दाते, सुहास आहेर, जयराम दाते अजित आहेर प्रताप गवळी भाऊसाहेब आंद्रे कैलास दाते हे सगळे मक्याच्या दिशेने पळाले. दाते यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचे संपूर्ण कपडे रक्ताने भिजले होते. दवाखान्यात आल्यावर सुहास आहेर यांनी स्वतःच्या अंगातील शर्ट दाते यांना घालायला दिले.
दरम्यान किरण दाते यांच्यावर नारायणगाव येथील ग्रामीण रुग्णालयात सध्या उपचार सुरू असून डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने मंचर येथील उपजिल्हा रुग्णालयात डोक्याला डोक्याला झालेल्या जखमा किती खोलवर आहे याची खातरजमा करून पुढील उपचार केले जाणार असल्याचे वैद्यकीय अधिकारी ऐश्वर्या सावरे यांनी सांगतले.
दरम्यान वनक्षेत्रपाल लहू ठोकळ यांनी नारायणगाव या ठिकाणी जाऊन बिबट्याने हल्ला केलेल्या रुग्णांची विचारपूस केली. बिबट्या संदर्भात जनतेने सतर्क रहावे, शेतामध्ये काम करीत असताना हातामध्ये काठी तसेच मोबाईलमधील गाणी सुरू ठेवावीत जेणे करून आवाजाने बिबट्या पळून जाईल तसेच जर कुठे बिबट्या आढळला तर तात्काळ वन विभागाशी संपर्क साधावा, असे त्यांनी आवाहन केले आहे. ज्या ठिकाणी बिबट्याने हल्ला केला आहे त्या परिसरामध्ये तात्काळ पिंजरा लावण्याची व्यवस्था करण्यात येईल, असेही ठोकळ यांनी सांगितले.