Pune Rain Update: बंगालच्या उपसागरात तयार झालेले ‘दाना’ चक्रीवादळ शुक्रवारी दुपारी क्षीण होत ओडिशा किनारपट्टीवरून वायव्य दिशेकडे गेले. त्याचा वेग ताशी 75 किमी झाला असून ते पुढील काही तासांत पूर्ण कमकुवत होणार आहे.
दरम्यान, महाराष्ट्रात रविवार ते मंगळवार या तीन दिवसांत यलो अलर्ट दिला आहे. त्यामुळे ऐन दिवाळीत राज्यात पाऊस राहणार आहे. दिवसभर कडक ऊन, दुपार ते सायंकाळी पाऊस आणि पहाटे दाट धुके, असे वातावरण राज्यात राहणार आहे. ‘दाना’ हे चक्रीवादळ ओडिशाच्या उत्तर किनारपट्टीच्या पुढे सरकले आहे. त्याचा वेग ताशी 120 वरून 65 ते 75 किमी इतका कमी झाला आहे.
ते उत्तर ओडिशा ओलांडून जवळपास पश्चिमेकडे सरकण्याची शक्यता आहे. शनिवारी दुपारपर्यंत त्याचे कमी दाबाच्या पट्ट्यात रूपांतर होऊन ते शांत होईल. या वादळाचा महाराष्ट्रावर फारसा परिणाम झाला नसला तरी रविवार ते मंगळवार राज्यातील बहुतांश भागांत हलका ते मध्यम पाऊस राहील. पश्चिम बंगाल, ओडिशा आणि काही प्रमाणात झारखंड राज्यांना दाना चक्रीवादळाचा फटका बसला असून, अनेक भागांना पावसाने झोडपून काढले.