खुटबाव: दौंड तालुक्यातील यवत येथे झालेला हल्ला आणि जाळपोळप्रकरणी जिल्हाधिकारी यांच्या जमावबंदीच्या आदेशानुसार यवत गाव तिसर्या दिवशीही बंदच आहे. त्यामुळे सर्व व्यवहार ठप्प असून सर्वत्र शुकशुकाट आहे.
कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून गावात मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यवत येथे लागू केलेली जमावबंदी रविवार (दि. 3) रात्री 12 वाजेपर्यंत असून, ती शिथिल करून सोमवारी बाजारपेठ सुरू होऊन सर्व व्यवहार पूर्ववत होण्याची आशा छोट्या-मोठ्या व्यावसायिकांना आहे. (Latest Pune News)
एका तरुणाने दि. 1 ऑगस्ट रोजी सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्यामुळे जमाव आक्रमक होत आक्षेपार्ह पोस्ट टाकणार्या तरुणाच्या घराची तोडफोड तसेच दोन प्रार्थनास्थळ आणि वाहनांची तोडफोड करून या जमावाने एका बेकरीला आग लावली होती.
पोलिसांनी हस्तक्षेप करीत परिस्थितीवर नियंत्रण मिळवून आक्रमक जमाव पांगवला होता, परंतु जिल्हाधिकारी यांनी दि. 1 ते दि. 3 ऑगस्टपर्यंत रात्री 12 वाजेपर्यंत जमावबंदी लागू केली आहे. पोलिसांनी जवळपास 600 जणांवर गुन्हे दाखल केले असून, आतापर्यंत 15 जणांना अटक केली आहे. त्यांना न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे. अत्यावश्यक सेवा वगळून यवत गावची बाजारपेठ पूर्णपणे बंद असून, पोलिसांचा ठिकठिकाणी बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, सध्या तरी गावात शांततेचे वातावरण आहे.