

खुटबाव: यवत (ता. दौंड) येथील ग्रामीण रुग्णालयात रेबीज लसीचा तुटवडा निर्माण झाला आहे. येथे दोन दिवसांपासून लस उपलब्ध नाही. त्यामुळे कुत्रे चावलेल्या रुग्णांना रेबीज लस घेण्यासाठी पुणे येथील ससून रुग्णालयात जाण्याची वेळ आली. या धावपळीमुळे रुग्णांनी सरकारी आरोग्य सेवेविषयी नाराजी व्यक्त केली आहे. (Latest Pune News)
सध्या ठिकठिकाणी भटक्या कुर्त्यांची संख्या वाढली आहे. तसेच कुत्र्यांच्या हल्ल्याचेही प्रकार वाढले आहेत. अनेक ठिकामी पिसाळलेले कुत्रे चावण्याच्या संख्येत वाढ झाली आहे. कुत्रा, मांजर किंवा इतर प्राण्यांच्या चाव्यानंतर उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना यवत येथे मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
रेबिज प्रतिबंधात्मक उपाय म्हणून रुग्णांना चोवीस तासांत रेबीजची लस घेणे आवश्यक असते. मात्र यवत ग्रामीण रुग्णालयात गेल्या दोन तीन दिवसांपासून लस उपलब्ध नाही. त्यामुळे रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना खासगी रुग्णालयांतून महागड्या दरात लस घ्यावी लागली. तर काही रुग्णांना पुणे येथील ससून रुग्णालयात जावे लागत आहे. ग््राामीण भागातील अनेक नागरिकांना ही आर्थिकदृष्ट्या परवडणारी गोष्ट नसल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
केडगाव, राहू, वरवंड, उरुळी कांचन येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात रेबीजची लस नाही. त्यामुळे तेथील रुग्ण यवतच्या रुग्णालयात येत होते. त्यांना आम्ही नाकारू शकत नाही. येथे ऑक्टोबरमध्ये तब्बल 444 रुग्णांना रेबीजची लस देण्यात आली आहे. परिणामी येथील लसीचा साठा संपला. औंध उपजिल्हा रुग्णालयातून लसीचा पुरवठा केला जातो. मात्र तेथीलही साठा संपला आहे. त्यामुळे ग्रामीण रुग्णालय, आरोग्य केंद्रांना लसीचा पुरवठा होऊ शकला नाही. येथे मंगळवारपर्यंत लस उपलब्ध करण्याचा प्रयत्न आहे.
डॉ. किशोर पत्की, वैद्यकीय अधीक्षक, ग््राामीण रुग्णालय, यवत