Health News: खड्ड्यांनी मोडला पाठीचा कणा

सततचा प्रवास, चुकीच्या जीवनशैलीमुळे मणक्याचे विकार वाढले
Health News
खड्ड्यांनी मोडला पाठीचा कणाPudhari
Published on
Updated on

प्रज्ञा केळकर-सिंग

Pune News: नोकरदारांचा अर्धा दिवस प्रवासातच जातो. बस, दुचाकीने प्रवास करताना रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे नागरिकांच्या पाठीचा कणा मोडण्याचे प्रमाण वाढले आहे. सतत बसणारे गचके, गाडी चालवताना चुकीच्या पद्धतीने बसण्याची सवय (पोश्चर) यामुळे तरुण वयातच मणक्याचे विकार उद्भवू लागले आहेत.

विश्रांती न घेता करावा लागणारा सततचा प्रवास, खड्डेमय आणि कच्च्या रस्त्यावरून गाडी चालविणे, बसमधील मागच्या सीटवरील प्रवास, यामुळे मणक्यावर ताण येत असतो. पाठीवर वजन घेऊन जास्त वेळ चालणे, वारंवार जड वजन उचलणे, याचाही ताण येत असतो. यामुळे मणक्याचे विकार वाढतात आणि वेळीच उपचार न केल्यास तीव्रता वाढत जाते.

चारचाकी गाडी चालवताना आपली पाठ पूर्णपणे सीटला टेकली आहे का, दुचाकी चालवताना आपण ताठ बसलो आहोत का, वाहन चालवताना पाठीवर अतिरिक्त ताण येत नाही ना, याची काळजी घेण्याची गरज असल्याचे मत मणकाविकार तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

मणक्याचे विकार कमी होण्यासाठी जीवनशैली बदलणे, योग्य आहार घेणे महत्त्वाचे आहे. सततच्या मोबाईल वापरामुळेही मणक्याचे विकार वाढतात. याशिवाय वेडेवाकडे, चुकीच्या पद्धतीचे स्पीडब्रेकर, खड्डे यामुळेही विकार वाढतात.

डॉ. मोहित मुथा म्हणाले, मणक्याच्या समस्यांमध्ये सुमारे 60 टक्के वाढ झाली आहे. 20-55 वयोगटातील व्यक्ती पाठीच्या किंवा मानेच्या तीव्र वेदनांची तक्रार करत आहे. काही वेळा मूत्र किंवा आतड्यांवरील नियंत्रण कमी होणे, मुंग्या येणे किंवा हात व हाताची बोटे, पाय आणि पायाची बोटे यांमधील संवेदना कमी होणे अशा तक्रारी सतावतात. दाखल झालेल्या 10 पैकी 7 रुग्णांना पाठ आणि मानदुखीची समस्या आढळून येत आहे.

20-45 वर्षे वयोगटातील तरुणांना पाठ किंवा मानेच्या दुखण्याने घेरले आहे. अनेक जण आपला स्मार्टफोन पाहत असताना कित्येक तास कुबड काढून बसतात. अशा व्यक्तींना डोकेदुखी, मानदुखी, हातदुखी आणि बधिरपणा असे त्रास होऊ शकतात. उभे राहण्याच्या पद्धतीमध्ये मान आणि पाठ सरळ राहत असते; पण जेव्हा आपण मान खाली करून खूप वेळ पाहत राहतो तेव्हा मान, पाठ आणि कणा या सगळ्यांवरच त्याचा ताण येतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news