महाळुंगे पडवळ: आंबेगाव तालुक्याच्या उत्तर भागात वाढत्या उष्णतेमुळे मका पिकावर अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी त्रस्त झाला आहे. त्यामुळे तालुक्यातील बहुतांश क्षेत्रावरील पीक धोक्यात आले आहे.
डिंभे धरण लाभक्षेत्रात येणार्या अनेक गावांमध्ये नगदी उत्पन्न देणारे पीक, त्याचबरोबर जनावरांचा आणि उन्हाळ्यातला ओला चारा म्हणून मका पिकाला शेतकरी प्राधान्याने पसंती देत आहेत. (Latest Pune News)
तालुक्यात सुमारे दीड हजार हेक्टर क्षेत्रावर मका पिकाची लागवड झालेली आहे. मका लागवडीसाठी एकरी सुमारे तीन किलो बियाणे लागते. त्यातून 200 गोणी मका उत्पादित होते. चांगला बाजार भाव मिळाल्यास शेतकर्यांना खर्च वजा जाता एक लाख रुपयांचे निव्वळ उत्पन्न होते.
पण, यंदा उन्हाची तीव्रता लक्षात घेता मका पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव मोठा दिसत आहे. मका पिकातील कोंब लष्करी अळी खाते. त्याचबरोबर हिरवी पाने कुरतडत असल्यामुळे उत्पादनात घट होते. महागडी औषधे व खर्च वाचविण्यासाठी अनेक शेतकरी साबणाचा फेस किंवा शाम्पू पावडरचे पाणी मका पिकावर फवारणी करीत असल्याचे चित्र तालुक्यात पाहायला मिळाले.