

प्रज्ञा केळकर-सिंग
पुणे: दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात वेळेत उपचार न झाल्याने महिलेचा मृत्यू झाल्यानंतर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. रुग्णालयाने अहवालामध्ये महिलेसाठी गर्भधारणा आणि प्रसूती धोकादायक असल्याची डॉक्टरांनी कल्पना दिली होती, असा खुलासा केला आहे. यावरून अतिजोखमीच्या गर्भधारणेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. गर्भधारणेचा निर्णय घेण्यापूर्वी सर्व तपासण्या आणि समुपदेशन आवश्यक असल्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.
दरवर्षी 7 एप्रिल रोजी जागतिक आरोग्य दिवस साजरा केला जातो. यंदाच्या आरोग्य दिवसाची थीम ‘निरोगी सुरुवात, आशादायक भविष्य’ अशी आहे. यातून माता आणि नवजात बालकांचे आरोग्य, जगण्याची गुणवत्ता यावर भर देण्यात आला आहे. माता आणि बालमृत्यूंबद्दल जागरूकता वाढवणे हे यामागचे उद्दिष्ट आहे.
प्रत्येक महिलेला मातृत्वाची आस असते. त्यातच कुटुंबीयांकडून, समाजाकडूनही आलेल्या दबावातून ताण आलेला असतो. काही महिलांमध्ये कमी वयातच मधुमेह, हृदयविकार, मूत्रपिंडाचे आजार, कर्करोग, एपिलेप्सी, गर्भाशयाशी संबंधित गुंतागुंत अशा समस्यांचे निदान होते. अशा परिस्थितीत डॉक्टरांच्या सल्ल्याने सर्व तपासण्या करून, भविष्यातील संभाव्य धोक्यांचा विचार करून गर्भधारणेबद्दल निर्णय घेणे महिलेच्या आणि बाळाच्या दृष्टीने फायद्याचे असते, असे स्त्रीरोगतज्ज्ञांचे म्हणणे आहे.
अशा परिस्थितीत गर्भधारणा टाळण्याचा दिला जाऊ शकतो सल्ला
गंभीर हृदयविकार, अनियंत्रित मधुमेह, मूत्रपिंडाचे गंभीर आजार : किडनीच्या गंभीर समस्या, काही ऑटोइम्युन आजार, मानसिक आरोग्य समस्या, कर्करोग, मागील गर्भधारणेत गंभीर प्री-एक्लेम्पसिया किंवा एक्लेम्पसियाचा अनुभव, वारंवार गर्भपात, अत्यंत कमी किंवा जास्त वजन, धुम्रपान , मद्यपान किंवा ड्रग्सचे व्यसन, एचआयव्ही किंवा इतर गंभीर संसर्ग.
आकडे काय सांगतात?
गर्भधारणेपूर्वी सुमारे 50 टक्के महिलांना विविध आरोग्य समस्या असतात. दर महिन्याला, 23 ते 35 वयोगटातील 15 महिलांपैकी अंदाजे 4 महिलांना उच्च रक्तदाब असल्याचे आढळून येते, 5 महिलांमध्ये रक्तातील साखरेची पातळी वाढलेली असते, 3 महिलांना थायरॉईडच्या समस्यांचे निदान होते आणि सुमारे 3 महिलांना प्रजनन समस्यांना तोंड द्यावे लागते. 80 टक्के महिलांना गर्भधारणेपूर्वीच्या समुपदेशनाबद्दल माहितीच नसते.
कोणत्या तपासण्या आवश्यक?
महिलांना अशक्तपणा, थायरॉईड समस्या आणि रक्तातील साखरेची पातळी तपासण्यासाठी रक्त चाचण्या करण्याचा सल्ला दिला जातो. '
रुबेला, हेपेटायटीस आणि एचआयव्हीसारख्या आजारांसाठी संसर्ग तपासणीदेखील करावी लागते.
अनुवंशिक चाचणीत अनुवंशिकरीत्या मिळालेल्या आजारांचे धोके ओळखण्यास मदत करते.
पेल्विक तपासणी आणि अल्ट्रासाऊंड सोनोग्राफी गर्भाशयाच्या आरोग्याचे मूल्यांकन करतात.
मधुमेह, थायरॉईड किंवा आई आणि बाळासाठी धोकादायक ठरू शकणारे संक्रमण यासारख्या समस्या शोधण्यात तपासण्या महत्त्वाची भूमिका बजावतात. सिस्टिक फायब्रो सिस किंवा सिकल सेल अॅनिमियासारख्या अनुवंशिक आजारांचा कौटुंबिक इतिहास असलेल्या जोडप्यांना, गर्भावस्थेतील मधुमेह किंवा गुणसूत्र विकृतींसह गुंतागुंत होण्याचा जास्त धोका जास्त असलेल्या 35 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या महिलांना या समुपदेशनाचा नक्कीच फायदा होतो. वंध्यत्वाचा सामना करणार्या जोडप्यांसाठी, लवकर लवकर समुपदेशन करून ओव्ह्युलेशन चक्रातील अनियमितता, शुक्राणूंची गुणवत्ता किंवा इतर प्रजननविषयक आव्हाने दूर करता येऊ शकतात. यामुळे यशस्वी गर्भधारणेची शक्यता वाढते.
- डॉ. पद्मा श्रीवास्तव, प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ज्ञ
गर्भधारणा आणि प्रसूती सुखरूप व्हावी असे प्रत्येक जोडप्याला वाटते. मात्र, या प्रवासात बर्याचदा काही शारीरिक आणि मानसिक आव्हानांचा सामना करावा लागतो. हे टाळण्यासाठी गर्भधारणेपूर्वी समुपदेशनाचा आधार घेतल्यास अनेक समस्या दूर करता येऊ शकतात. शारीरिक व मानसिक आजार, अनुवंशिक आजार याबाबत चर्चा, तपासणी करून भविष्यातील निरोगी गर्भधारणेसाठी जोडप्यांना तयार केले जाते. गर्भधारणेदरम्यान कोणती औषधे घेणे आवश्यक आहे आणि कोणती टाळायला हवी, याबाबत मार्गदर्शन केले जाते.
- डॉ. रश्मी निफाडकर, वंधत्व निवारण तज्ज्ञ