World Earth Day 2025: जागतिक वसुंधरा दिन विशेष; दरवर्षी पृथ्वी पोटात घेते कोटी टन कचरा

पृथ्वीवरच्या 700 प्रजाती धोक्यात...
World Earth Day 2025
जागतिक वसुंधरा दिन विशेष; दरवर्षी पृथ्वी पोटात घेते कोटी टन कचरा File Photo
Published on
Updated on

आशिष देशमुख

World Earth Day Special News: प्लास्टिकचा शोध लागला तेव्हा ते पृथ्वीला धोका निर्माण करेल, असे वाटले नव्हते. मात्र, आज तशी वेळ आली आहे. कारण, मानवजात वसुंधरेच्या पोटात दरवर्षी तब्बल 40 कोटी टन कचरा नव्याने तयार करून टाकत आहे. त्यामुळे 2040 पर्यंत आपल्याला 60 टक्के प्लास्टिक कचरा कमी करण्याचे आव्हान घ्यावे लागत आहे. तसे केले नाही, तर पृथ्वीसह मानवजातीला धोका आहे, असा इशारा संयुक्त राष्ट्र संघासह पर्यावरणतज्ज्ञांनी दिला आहे.

संयुक्त राष्ट्र संघाने 22 एप्रिल हा दिवस जागतिक वसुंधरा दिन म्हणून 1970 साली घोषित केला. यंदा 55 वा वसुंधरा दिन 22 एप्रिल 2025 रोजी साजरा होणार आहे. पृथ्वीची निर्मिती सुमारे 4.5 अब्ज वर्षांपूर्वी झाली, असे मानले जाते.

दरवर्षी प्लास्टिक कचरा, बदलते हवामान, वाढते तापमान, हरितगृह वायू विषय घेऊन जगभरात हा दिवस साजरा केला जातो. मात्र, मानवाच्या अतिरेकामुळे वसुंधरा त्याने केलेल्या परिणामांचा भार घेऊन थकत चालली आहे. वाढता प्लास्टिकचा कचरा हे सर्वांत मोठे आव्हान मानवासमोर असून, 2040 पर्यंत तो 60 टक्क्यांनी कमी केला नाही, तर वसुंधरेचे अस्तित्वच धोक्यात येईल, अशी स्थिती निर्माण झाल्याचे पर्यावरण शास्त्रज्ञ सांगत आहेत.

पृथ्वीवरच्या 700 प्रजाती धोक्यात...

पर्यावरण शास्त्रज्ञांच्या मते, पृथ्वीवर यत्र, तत्र, सर्वत्र प्लास्टिक कचरा इतका वाढलाय की, त्यामुळे तिच्या उदरात वास्तव्य करणार्‍या सुमारे 700 जीवांच्या प्रजाती नामशेष होत आहेत. यात समुद्री मासे, पक्षी, प्राणी यांचा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे. संयुक्त राष्ट्र संघाच्या अहवालानुसार जगातील महासागरात प्लास्टिकच्या कचर्‍याचे महाकाय डोंगर तयार झाले आहेत. ते काढणे सर्वात मोठे आव्हान मानवासमोर आहे.

तज्ज्ञांनी सुचविलेले उपाय आणि महत्त्वाचे मुद्दे ...

  • दरवर्षी जगात 40 कोटी टन प्लास्टिक कचरा तयार होतो.

  • आत्तापर्यंत उत्पादित झालेल्या एकूण प्लास्टिकपैकी 50 टक्के प्लास्टिक गत 20 वर्षांत तयार झाले आहे.

  • भारत सरकारच्या केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अहवालानुसार देशात वर्षाला 4.1 दशलक्ष मेट्रिक टन प्लास्टिक कचरा तयार होतो.

  • हरितगृह वायू उत्सर्जन 56 टक्क्यांनी वाढले आहे. त्यामुळे 2030 पर्यंत पृथ्वीचे तापमान दीड अंशाने वाढणार.

  • गत 270 वर्षांत कार्बनडाय ऑक्साईटचे प्रमाण 47 टक्के, मिथेनचे 156 टक्के वाढले आहे.

  • दरवर्षी पृथ्वीवर 4.7 टक्के दशलक्ष हेक्टर जंगल कमी होत आहे.

  • जैविक संपदा कमी होत असल्याने विषाणूंचा प्रभाव वाढत आहे.

  • काचेच्या, धातूच्या बाटल्या, स्टिल प्लेट, कागदी स्ट्रॉ, असे अनेक पर्याय संयुक्त राष्ट्र संघाने जगातील देशांना प्लास्टिकचा पर्याय म्हणून सुचवले. मात्र, बहुतांश देश प्लास्टिक कचरा कमी करण्यात अपयशी ठरले आहेत.

  • रस्त्यावरचा कचरा एक दिवस तरुण मुले उचलताना दिसतात. मात्र, आता तो दररोजच उचलण्याची वेळ आली आहे.

  • हवा, पाणी आणि वायू प्रदूषण ही मोठी समस्या मानवाने पृथ्वी समोर निर्माण केली आहे. या तिन्ही माध्यमांतून होणाऱ्या विषाणू संसर्गामुळे दरवर्षी जगात लाखो माणसे मृत्युमुखी पडतात. यात पशुपक्षी आणि समग्र जीवसृष्टीचा अंदाज बांधणे अवघड झाले आहे.

  • तज्ज्ञांच्या मते, नद्या स्वच्छ ठेवणे, भरपूर झाडे लावणे, हरितगृह वायू कमी करणे या पर्यायांमुळेच पृथ्वीचे आयुष्य म्हणजे मानवाचे आयुष्य वाढू शकते.

आता आपल्याला वारसा आणि विकास या दोन्हीवर एकत्रितपणे काम करण्याची वेळ आली आहे. नुसताच विकास केला तर पृथ्वीचा ऱ्हास अटळ आहे. रस्त्यावरची झाडे न तोडता त्याचे पुनर्रोपण शक्य आहे. हा प्रभावी उपाय केला तरच झाडे वाढतील. झाडे तोडून तेवढी पुन्हा लावणे शक्यच होत नाही. तसेच प्लास्टिक कचरा कमी करणे आपल्या हाती आहे. पर्यावरणाचे संतुलन राखणे आपल्याच हातात आहे. त्यासाठी आबालवृद्धांना एकत्र घेऊन आठवड्यातून एक दिवस पर्यावरण रक्षणासाठी काम करण्याची वेळ आली आहे. तरच पृथ्वीचा होणारा र्‍हास थांबू शकतो.

- डॉ. राजेंद्र शेंडे, सदस्य, संयुक्त राष्ट्र संघाची पर्यावरण समिती, पुणे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news