कामगार विमा रुग्णालये सलाइनवर; सामान्यांना उपचार कसे मिळणार?

मोठा गाजावाजा करत आजपासून जनआरोग्य योजनेचा शुभारंभ
Pune News
कामगार विमा रुग्णालये सलाइनवर; सामान्यांना उपचार कसे मिळणार?File Photo
Published on
Updated on

राहुल अडसूळ

पुणे: कामगार व त्यांच्या कुटुंबीयांच्या हक्काच्या राज्यातील कामगार विमा योजना रुग्णालयांमध्ये औषधांचा ठणठणाट आहे. इथे अत्याधुनिक यंत्रसामग्री नाही. तीन वर्षांपासून सहा आयसीयू कुलूपबंद आहेत. सर्वच संवर्गातील अनेक रिक्त पदे भरलेली नाहीत. अशा दयनीय अवस्थेमुळे योजनेची बारा कामगार रुग्णालये सलाइनवर आहेत.

त्यातच आजपासून (दि. 7) सर्वसामान्य रुग्णांनाही याच रुग्णालयांत महात्मा जनआरोग्य योजनेतून पाच लाख रुपयांपर्यंतचे वैद्यकीय उपचार मोफत दिले जाणार आहेत. विशेष म्हणजे स्थानिक स्तरावर मोठा गाजावाजा व प्रसारमाध्यमांमध्ये जाहिराती करून याचा थाटात शुभारंभ होत आहे.

असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी मुंबई, पुणे, कोल्हापूरसह राज्यभरात 12 कामगार विमा रुग्णालये कार्यरत आहेत. या माध्यमातून अंदाजे 49 लाख कामगारांना उपचार मिळतात. त्यापोटी कामगारांच्या वेतनातील काही रक्कम केंद्र सरकारच्या तिजोरीत जमा होते. सद्य:स्थितीत केंद्रीय विमा महामंडळ आणि महाराष्ट्र राज्य कामगार सोसायटीत कोणतीही आर्थिक चणचण नाही. असे असतानाही इथे औषधांचा ठणठणाट असतो.

विशेषज्ज्ञ, वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, लिपिक संवर्ग, पॅरामेडिकल ते चतुर्थ श्रेणी पदांवरील कर्मचार्‍यांचा तुटवडा, तर पाचवीलाच पूजलेला आहे. अनेक डॉक्टर, कर्मचारी कंत्राटी पद्धतीने भरलेले आहेत. संपूर्ण योजनेत समन्वयाचा अभाव आहे. त्यामुळे लेटलतिफ अधिकारी व कर्मचार्‍यांचे फावत असून, कामगार रुग्णांना उपचारासाठी हेलपाटे मारले लागतात.

तीन वर्षांपासून आयसीयू कुलूपबंद

तीन वर्षांपासून राज्यात सहा आयसीयू कुलूपबंद अवस्थेत आहेत. अत्याधुनिक उपचार सेवा नसल्याने ’रेफर टू ऑदर हॉस्पिटल’चा आजार विमा रुग्णालयांना जडला आहे. बाह्य रुग्ण विभागात (ओपीडी) वैद्यकीय अधिकारी उशिरा येतात. आंतर रुग्ण विभागाबद्दल तर न बोललेले बरे.

अशी दयनीय स्थिती बहुतांश कामगार विमा रुग्णालयांची आहे. जिथे कामगारांनाच योग्य उपचार मिळत नाहीत, तिथे सर्वसामान्यांना जनआरोग्य योजनेतून पाच लाख रुपयांपर्यंतचे वैद्यकीय उपचार मोफत दिले जाणार आहेत. विमा रुग्णालये आधीच सलाइनवर असतील, तर सर्वसामान्यांच्या शस्त्रक्रियांचे काय ? असे अनेक सवाल तज्ज्ञ उपस्थित करत आहेत.

कर्मचार्‍यांना सूचना

जागतिक आरोग्य दिनाचे निमित्त साधून आपली सर्व रुग्णालये महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना व प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेशी संलग्न झाली आहेत. त्यानुसार सोमवारपासून रुग्णालये सर्व सामान्यांसाठीही खुले राहणार आहेत, याची सर्वांनी नोंद घ्यावी, अशा सूचना स्थानिक प्रशासनाने कर्मचार्‍यांना दिलेल्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news