

पुणे : पुढारी वृत्तसेवा
महामार्गावरील नवले पूलनजीक नेहमी होणारे अपघात टाळण्यासाठी तातडीने कामे सुरू केली जाणार आहेत. कात्रज बोगदा ते नवले पूल यादरम्यानचे अपघात टाळण्यासाठी या ठिकाणी पुन्हा नव्याने तातडीच्या आणि दीर्घकालीन उपाययोजना करण्यात येणार आहेत. त्यामधील तातडीच्या उपाययोजनांची अंमलबजावणी सुरू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी गुरुवारी प्रशासनाला दिले.
महामार्गावर सुरक्षा अडथळे, रंबल स्ट्रिप, वेगमर्यादा निश्चित करणे, सेवा रस्त्यांवरील अतिक्रमणे काढणे आदी कामे तातडीने हाती घेण्यात येणार आहेत. कात्रज बोगदा ते नवले पुलापर्यंत तीव्र उतार असल्याने या परिसरात सातत्याने अपघात होत आहेत. या भागात यापूर्वी अनेक उपाययोजना करण्यात आल्या. मात्र, तरीदेखील गेल्या काही दिवसांपासून जीवघेण्या अपघातांची मालिका सुरूच आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात गुरुवारी संबंधित यंत्रणांची बैठक घेतली.
जिल्हाधिकारी डॉ. देशमुख म्हणाले की, या भागात सातत्याने होणारे अपघात टाळण्याविषयी एका खासगी संस्थेला अभ्यास करण्यास सांगितले होते. या संस्थेने अभ्यास करून अहवाल सादर केला आहे. त्यानुसार कार्यवाही देखील करण्यात आली. मात्र, तरी देखील अपघात होत आहेत. त्यामुळे वेगळ्या प्रकारच्या उपाययोजना प्रशासनाकडून हाती घेण्यात येणार आहेत. सर्व संबंधित विभागांना अंमलबजावणीसाठी त्यांच्या सूचना लिखित स्वरूपात देण्याचे आणि या उपाययोजना पुढील 15 दिवसांत करण्याचे आदेशही बैठकीत देण्यात आले, असेही डॉ. देशमुख यांनी स्पष्ट केले.
महामार्गाच्या सेवारस्त्यांवर वाहने लावण्यास बंदी केली जाणार आहे. सेवारस्त्यांवरील अतिक्रमणे काढण्याचे आदेश महापालिकेला दिले आहेत. फळ-भाजी विक्रेत्यांना या ठिकाणावरून हटविण्यात येणार आहे. जड वाहनांच्या वेगावर मर्यादा आणण्यासाठी मोठ्या प्रमाणात रम्बल स्ट्रिप करण्यात येणार आहेत.