भीमेवरील कुगाव ते शिरसोडी पुलाचे काम सुरू ; ‘उजनी’ पर्यटन, इंदापूरच्या व्यापार, दळणवळणात वाढ होणार

अनेक वर्षांपासून भीमा नदीवर जोडपूल करण्याची मागणी
bridge work
पुलाचे काम सुरूPudhari
Published on
Updated on

इंदापूर तालुक्यातील शिरसोडी ते सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील कुगाव या भीमा नदीवरील पुलाच्या कामाला सुरुवात झाल्याने करमाळा व इंदापूर तालुक्यातील नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे. या पुलामुळे उजनी धरणातील पर्यटनाला चांगली चालना मिळण्यास मदत होणार आहे. इंदापूर शहरातील बाजारपेठेतील व्यापारवाढीसाठीही या पुलामुळे वाढणार्‍या दळणवळणाचा फायदा होईल.

उजनी धरण पाणलोट क्षेत्रात करमाळा तालुक्यातील गावांना इंदापूर तालुक्यातील हाकेच्या अंतरावर असणार्‍या गावात जाण्यासाठी रस्ते मार्गाने 80 ते 90 कि. मी. भिगवण, टेंभुर्णी येथून वळसा घालून किंवा जीव धोक्यात घालून जलमार्गाने प्रवास करावा लागतो. आत्तापर्यंत जलवहातुकीमध्ये 40 हून अधिक प्रवाशांना जलसमाधी मिळाली आहे. उजनी जलाशयात भीमा नदीवर जोडपूल करण्याची मागणी त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून उजनीकाठच्या लोकांची होती. इंदापूर येथील व्यापार्‍यांनीही या पुलाची मागणी केली होती.

माजी राज्यमंत्री, आमदार दत्तात्रय भरणे यांनी याची दखल घेऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून तसेच विधानसभेत याचा पाठपुरावा करून विधानसभा निवडणुकीपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या पुलाच्या कामाला मंजुरी देऊन 23 ऑगस्ट 2024 रोजी भूमिपूजन केले होते.

आता या कामाला प्रत्यक्षात सुरुवात झाल्याने दोन्ही काठच्या ग्रामस्थांतून समाधान व्यक्त होत आहे. तिन्ही बाजूंनी 30 किलोमीटर पाण्याने वेढलेल्या हनुमान जन्मग्राम असा उल्लेख असलेल्या कुगावसह परिसरातील इतरही गावांना इंदापूर तालुक्यातील गावांशी दळणवळणाचा प्रश्न बिकट होता, हा पूल झाल्यानंतरही मोठी अडचण दूर होणार आहे. हा पूल झाल्यावर पर्यटन, मत्स्य व्यवसाय, पक्षी निरीक्षण, कृषी व दळणवळण व्यवस्था बळकट करण्यासाठी चालना मिळणार आहे.

पुलाचे काम दर्जेदार व्हावे यासाठी दोन्ही बाजूचे नागरिक योग्य दक्षता घेत आहेत. इंदापूर, माढा, करमाळा तालुक्यास वरदान ठरलेल्या उजनी धरण परिसरात सुरक्षित जलवाहतूक, उजनी पाणलोट क्षेत्रात येणार्‍या 350 हून जास्त प्रकारच्या पक्षांचे निरीक्षण करण्यासाठी पक्षी निरीक्षण केंद्र, उजनी धरण क्षेत्रात पर्यटन आदी बाबींवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून या परिसराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी मी कटिबध्द आहे.

दत्तात्रय भरणे, माजी राज्यमंत्री, आमदार इंदापूर

असा आहे पूल

कुगाव ते शिरसोडी दरम्यान उजनी बॅकवॉटर पात्रात 1320 मीटरचा पूल असून कुगाव बाजूला 420 मीटर तर शिरसोडी बाजूला 250 मीटरचा भराव आहे. या पुलासाठी राज्य शासनाने 394 कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता दिली असून, 284 कोटी 53 लाखांची ई-निविदा देखील काढली होती. मे. टी. अ‍ॅन्ड टी पुणे या कंपनीला 307 कोटी रुपयांचा ठेका मिळाला असून 900 दिवसांत काम पूर्ण करण्याची अट टाकण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news