वाघोली: ‘पाणी द्या नाही, तर टॅक्स नोटीस वापस’, ‘वीस वर्षांपासून पाण्याविना असलेल्या वाघोलीकरांची तहान भागवा’ यासह विविध घोषणा देत वाघोलीत महिलांनी डोक्यावर हंडा आणि हातात फलक घेऊन पाण्यासाठी आंदोलन केले. नगर रोडवर खांदवेनगर बस स्टॉप येथे करण्यात आलेल्या या आंदोलनात महिलांसह नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
राज्य सरकार आणि महापालिका प्रशासनाच्या निषेधार्थ या वेळी घोषणा देण्यात आल्या. परिसरातील महिला मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. महापालिकेने पाणीपुरवठा सुरळीत केला नाही किंवा प्रशासकीय स्तरावर टँकर पुरविले गेले नाही, तर आठ दिवसांत महापालिकेच्या मुख्यालयावर हंडा मोर्चा काढण्याचा इशारा या वेळी देण्यात आला आहे.
पाणीपुरवठा अधिकारी अन्वर मुल्ला यांनी उबाळेनगर भागात पाण्याची तात्पुरती सोय करण्यासाठी नवीन आर्थिक वर्षात सिंटेक्स टाक्या बसवण्याचे आश्वासन या वेळी महिलांना दिले. सीमा गुट्टे, सारिका वीर, सारिका वर्मा, सुचित्रा साखरे, अलका पाटोळे, पूनम ठाकुर, अनिता बुरसे, संजय कलोरे, विवेक वाडेकर, रमा आठवले आदींसह नागरिक मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले होते.