

चाकण : चाकण शहरात पुणे-नाशिक महामार्गावरील आंबेठाण चौकाजवळ हिंस्र भटक्या कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू झाला. रविवारी मध्यरात्री अर्धा डझन हिंस्र भटक्या कुत्र्यांनी झुंडीने हल्ला करून त्या महिलेच्या अंगाचे लचके तोडले. त्यामुळे अंगातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होऊन तिचा मृत्यू झाल्याचे सकाळी उघडकीस आले. शोभा विजय वाघमारे (वय 32, सध्या रा. चाकण, मूळ रा. देगलूर, जि. नांदेड) असे या घटनेत मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे.
चाकण शहरात पुणे-नाशिक महामार्गावरील आंबेठाण चौकाजवळील उड्डाणपुलालगत महिलेचा विवस्त्र व शरीराचे लचके तोडलेला मृतदेह सोमवारी (दि. 16) मिळून आला आहे. पोलिसांनी या भागात असलेल्या एका दुकानासमोरील सीसीटीव्हीतील द़ृश्य पाहिल्यानंतर सर्वांच्याच पायाखालची जमीन सरकली. उड्डाणपुलाखाली अर्धा डझन भटकी श्वान महिलेच्या अंगाचे लचके तोडत होती. महिलेच्या अंगातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होऊन तिचा मृत्यू झाल्याचे या द़ृश्यातून उघड झाले.
मध्यरात्री 2 वाजण्याच्या सुमारास संबंधित महिला पुणे-नाशिक महामार्गालगत आंबेठाण चौकाजवळील उड्डाणपुलाखालील सेवा रस्त्याने जात असताना सुमारे 6 श्वानांनी महिलेवर हल्ला केला. महिलेने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, श्वानांच्या झुंडीपुढे महिला अपयशी ठरली. मोकाट श्वानांची झुंड पाहून महिलेने दगड उचलले. मात्र, 6 श्वानांनी एकाच वेळी हल्ला चढविल्याने महिलेला प्रतिकार करणे अशक्य झाले. श्वानांच्या टोळक्याने महिलेच्या अंगावरील सर्व वस्त्रे फाडून टाकली व अंगाचे लचके तोडले. हात-पाय अन् तोंड-मान सगळ्या अंगावर चावे घेतले. सुमारे 15 मिनिटे हा थरार सुरू होता. मोठा रक्तस्राव व वेदना असह्य झाल्यामुळे महिलेने जागेवरच प्राण सोडले. सोमवारी सकाळी या भागातील नागरिकांनी विवस्त्रावस्थेतील महिलेचा मृतदेह पाहून चाकण उत्तर पोलिसांना घटनेची माहिती दिली. महिलेला विवस्त्र करून अत्याचार व खून केल्याची केल्याची चर्चा परिसरात सुरू होती; पण सीसीटीव्ही फुटेजमध्ये खरा प्रकार उघडकीस आला.