

पुणे : नाशिक येथील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण ताजे असतानाच पुण्यात देखील अशाच एका भोंदूबाबाचे कांड समोर आले आहे. ईश्वराचा अवतार असल्याचे भासवून एका उच्चशिक्षित तरुणीचा त्याने तब्बल १५ वर्षे शारीरिक, मानसिक छळ करून तिच्यावर बलात्कार केला. तिला आमानुष मारहाण करीत आपले मूत्र पिण्यास भाग पाडले आणि विजेचे शॉक दिले. राधामोहन मिश्रा असे त्याचे नाव असून, त्याच्यासह साथीदारांनाही पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
त्याने संबंधित तरुणीला नवऱ्यापासून घटस्फोट घेण्यास लावून तिची मालमत्ता आपल्या नावावर लिहून घेतली. या भोंदूने तरुणीच्या कुटुंबीयांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेत तिला त्यांच्याच नजरेत खोटे ठरवले. अखेर या भोंदूच्या अत्याचाराला बळी पडलेल्या तरुणीने धाडस करून एके दिवशी थेट आपले घर गाठले. तिने या बाबाची कुंडली जेव्हा घरच्यांना दाखवली तेव्हा त्यांच्या अंधश्रद्धेचा बुरखा टराटरा फाटला. भोंदूबाबाचा साथीदार स्वामी कंवल नयन याच्यासह सहा महिलांना खराडी पोलिसांनी अटक केली आहे. सकाळी साडेअकरा वाजेपर्यंत पोलिस आश्रमाची झडती घेत होते. बाबाने आपल्याला कोणी पकडायला आले, तर पळ काढता यावा, म्हणून एक गुप्तमार्गदेखील तयार करण्याची योजना आखली होती. तसे कामसुद्धा तेथे सुरू होते. हा प्रकार २००१ ते २०२६ दरम्यानच्या कालावधीत हरियाणा आणि पुणे परिसरात घडला आहे.
मी दैवी पुरुष आहे. तुम्ही माणसात माझ्या पाया पडू नका, मला महाराज म्हणू नका. मला 'अंकलजी' नावाने बोलवा. खोलीत मात्र माझ्या पाया पडा, माझे चरण अमृत प्या, असे तो आपल्या भक्तांना सांगत असे.
पोलिसांनी आश्रमातून बारा लॅपटॉप, एक टॅब, ११ मोबाईल, १९ हार्डडिस्क, साडेसहा लाखांची रोकड, डीव्हीडी, सीडी, २३ पेन ड्राइव्ह, दहा राउंड काडतुसे, पंधरा लाखांचे दागिने जप्त केले आहेत.