

पुणे: आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ (वय 58, रा. फुरसुंगी, सासवड रस्ता) यांच्या खुनाचा मुख्य सूत्रधार हा अक्षय जावळकर, त्याला भरीस घालणारी ही मोहिनी वाघच असल्याचे पोलिसांच्या तपासात पुढे आले आहे. त्यांनी सतीश यांचा काटा काढण्यासाठी जादूटोण्याचा प्रयोग केल्याचा धक्कादायक प्रकार आरोपपत्रातून समोर आला आहे.
लष्कर न्यायालयात नुकतेच एक हजार पानांचे दोषारोपपत्र गुन्हे शाखेकडून दाखल करण्यात आले. अक्षय आणि मोहिनीसह अतिश जाधव, पवन शर्मा, नवनाथ गुरसाळे आणि विकास शिंदे या सहा जणांवर आरोपपत्र दाखल झाले आहे.
सतीश वाघ यांचा 9 डिसेंबर 2024 रोजी सकाळी साडेसातच्या सुमारास अपहरण करून पंधरा मिनिटांतच तब्बल 72 वार करून खून करण्यात आला. त्यानंतर त्यांचा मृतदेह शिंदवणे घाटात फेकून देण्यात आला. सतीश यांच्या मुलाने दिलेल्या फिर्यादीनुसार हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेचे गांभीर्य पाहता हा तपास पुढे हडपसर पोलिसांकडून गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला.
सुपारीचे सर्व पैसे अक्षयने दिले
पाच लाख रुपयांना ही सुपारी देण्यात आली. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या सुपारीतील एकही रुपया मोहिनी हिने दिला नाही. अक्षय याने आपल्याकडील दीड लाख रुपये सुरुवातीला अॅडव्हान्स म्हणून शर्मा याच्या बँक खात्यावर पाठवले. शर्मा आणि त्याच्या साथीदारांनी सतीश यांचा खून केल्यानंतर त्याच दिवशी दुपारी सव्वातीनच्या सुमारास अक्षय याने राहिलेले तीन लाख रुपये शर्माला त्याच्या वाघोली येथील घरी नेऊन दिले.
याबाबतचे फोटो तपासदरम्यान पोलिसांच्या हाती लागले आहेत. सतीश यांचा पाय तोडून त्यांना एक तर जागेवर बसवायचे किंवा त्यांचा खून करून वाटेतून कायमचे दूर करायचे होते. एकदा का सतीश यांचा बंदोबस्त झाला, की हॉटेल आणि खोल्यांचे भाडे, त्यातून मिळणारे सर्व उत्पन्न, मोहिनी हिच्या हातात येणार होते. त्यातूनच अक्षय आणि मोहिनी या दोघांनी मिळून सतीश यांचा पाच लाख रुपयांत सुपारी देऊन खून घडवून आणल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले.
गुन्ह्यातील न्यायवैद्यकीय पुरावे, आरोपी, फिर्यादी, साक्षीदार यांचे जबाब नोंदवले असून, वाघ यांचा मोबाईल, गुन्ह्यात वापरलेले वाहन, हत्यारे जप्त केली आहेत. याचा सर्व ऊहापोह आरोपपत्रात करण्यात आला आहे. दरम्यान, पोलिस आयुक्त अमितेश कुमार, अपर पोलिस आयुक्त शैलेश बलकवडे, उपायुक्त निखिल पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली अमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुदर्शन गायकवाड यांच्या पथकाने दोषारोपपत्र दाखल केले आहे.
2013 मध्ये जुळले सुत
मोहिनी वाघ आणि अक्षय जावळकर हे दोघे 2013 मध्ये एकमेकांच्या संपर्कात आले. अक्षय हा त्यांच्याकडे भाड्याने राहत होता. पुढे मोहिनी यांच्या मुलाला एका कॉलेजमध्ये प्रवेश मिळून देण्याच्या कारणातून दोघे आणखी जवळ आले. 2013 ते 2017 पर्यंत अक्षय हा मोहिनी हिच्याच घरी झोपायला असायचा.
मात्र, 2017 मध्ये सतीश यांना आपली पत्नी मोहिनी आणि अक्षय या दोघांबाबत संशय आला. तेव्हापासून अक्षय याने मोहिनीचे घर सोडले. पुढे तो दुसरीकडे राहण्यास गेला. मात्र, त्यांच्यातील अनैतिक संबंध सुरूच होते. मोहिनी पती सतीश यांच्या त्रासाला वैतागली होती.
घरातील दहा रुपये देखील खर्च करण्याचा अधिकार मोहिनीला नव्हता. त्यामुळे काही करून सतीश यांचा काटा काढण्याचे मोहिनी अक्षय याला सांगत होती. अक्षय आणि मोहिनी या दोघांनी विचार पक्का केल्यानंतर त्यांनी सतीश यांचा काटा काढण्याची योजना आखली.
एक वर्षापासून खुनाचे नियोजन
सतीश यांचा खून करण्यासाठी एक वर्षापासून दोघे नियोजन करत होते. घरात भेटता येत नसल्यामुळे दोघे एका लॉजवर भेटत असत. सतीश यांचा खून करण्यापूर्वी मोहिनी हिने एका मांत्रिक महिलेची देखील वाघ यांना आपल्या वाटेतून बाजूला करण्यासाठी मदत घेतली.
अक्षय याने सतीश यांच्या खुनाची सुपारी पवन शर्मा, नवनाथ गुरसाळे, विकास शिंदे या तिघांना दिली होती. त्यानुसार या तिघांनी वाघ यांची तब्बल तीन वेळा रेकी केली. सुरुवातीला दुचाकीवरून येऊन ठार मारण्याचे नियोजन केले. परंतु, परिसरातील गर्दी पाहता हे त्यांना शक्य झाले नाही.