पिरंगुट पुलाचे काम दोन महिन्यांत होणार का? नागरिकांचा सवाल

पिरंगुट पुलाचे काम दोन महिन्यांत होणार का? नागरिकांचा सवाल

पौड : पुढारी वृत्तसेवा : पुणे ते दिघी बंदर महामार्गाचे काम अनेक ठिकाणी पूर्ण होत आले आहे. या रस्त्यावर असलेल्या पुलाचे काम मात्र अपूर्ण आहे. पिरंगुट पोलिस चौकीजवळील पुलाचे काम सुरू करण्याचे नियोजन ठेकेदाराने केले आहे. यासाठी हा पूल पाडण्यात येणार आहे. शेजारीच माती व दगड टाकून नवीन रस्ता ठेकेदाराने तयार केला आहे. हा पूल दोन महिन्यांत पूर्ण न झाल्यास पाण्याच्या प्रवाहाने रस्ता वाहून जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पूल पाडल्यानंतर पुढील दोन महिन्यांत नवीन पूल तयार होणार का हा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.

परंगुट ओढ्यावरील पुलाशेजारी तात्पुरता रस्ता तयार करण्यात येत आहे. पुलाखालून ओढ्यातले पाणी जाण्यासाठी अंदाजे 2 ते अडीच फूट रुंदीचे दोन सिमेंट पाईप टाकण्यात आले आहेत. पावसाळ्यात हा ओढा तुडुंब भरून वाहतो. पावसाळा दोन महिन्यांवर येऊन ठेपला आहे. पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे मातीचा पूल वाहून जाऊ शकतो. मातीच्या पुलाला पाणी जाण्यासाठी कमीत कमी 12 फूट रुंदीचे किमान 6 सिमेंटचे पाईप आवश्यक आहेत. पावसाच्या पाण्याचा प्रवाह उरवडे गावावरून येत असल्याने त्याचा प्रचंड दाब असतो. त्याला सहन करण्यासाठी व पाणी योग्य क्षमतेने जाण्यासाठी व्यवस्था करण्यात आली तरच हा तात्पुरता पूल टिकू शकतो, अन्यथा पावसाळ्यात हा पूल वाहून जाऊन रस्ता बंद होण्याबरोबरच दुर्घटनाही घडू शकते.

आम्ही दोन दिवसांत स्थळ पाहणी करणार आहोत. त्यानंतर आवश्यक असेल, तर बदल करायला सांगू शकतो. मात्र, काम सुरू होईल की नाही, याचा निर्णय दोन दिवसांत होईल. या पुलाच्या कामासाठी महावितरणकडून युटिलिटी शिफ्टिंगअंतर्गत लवकर अंदाजपत्रक न मिळाल्याने कामास विलंब झाला आहे.

-शैलजा पाटील, कार्यकारी अभियंता, राज्य रस्ते विकास महामंडळ

दोन-तीन महिन्यांपूर्वीच अंदाजपत्रक व नाहरकत प्रमाणपत्र दिले आहे. सोबतच मागणीनुसार या कामासाठी स्थानिक ठेकेदारही उपलब्ध करून दिला आहे. काम का होत नाही, याबद्दल
माहीत नाही.

आनंद घुले, अधिकारी महावितरण

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news