मावळला नवा खासदार मिळणार?

मावळला नवा खासदार मिळणार?
Published on
Updated on

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : मावळ लोकसभा मतदारसंघ निवडणुकीची मतमोजणी येत्या मंगळवारी (दि. 4) म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे केली जाणार आहे. मतमोजणीप्रक्रिया सकाळी आठ वाजता सुरू करण्यात येणार आहे. साधारण दुपारी दोन वाजता मतमोजणी संपून मावळ मतदारसंघासाठी नवा खासदार मिळेल, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला यांनी मंगळवारी (दि. 28) दिली.

आकुर्डी येथील पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) इमारतीमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी शहराचे अतिरिक्त पोलिस आयुक्त वसंत परदेशी, निवडणूक समन्वय अधिकारी प्रवीण ठाकरे, हिंमत खराडे, निवडणूक समन्वयक अभिजित जगताप, निवडणूक सहाय्यक सचिन मस्के, मनीषा तेलभाते, माध्यम समन्वयक किरण गायकवाड, निवडणूक निरीक्षक समन्वयक प्रमोद ओंभासे, मनुष्यबळ कक्ष समन्वयक राजू ठाणगे आदी उपस्थित होते.

दीपक सिंगला यांनी सांगितले की, क्रीडा संकुलातील वेटलिफ्टिंग हॉलमध्ये मतमोजणी पार पडणार आहे. या ठिकाणी स्ट्राँग रूम तयार करून या निवडणूक मतदानासाठी वापरलेली ईव्हीएम यंत्रे व टपाली मतपेट्या ठेवण्यात आल्या आहेत. याठिकाणी कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. मतमोजणीच्या दिवशी या स्ट्राँग रूमचे सील निवडणूक अधिकारी आणि उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत उघडण्यात येणार आहे. त्यानंतर सकाळी आठ वाजल्यापासून प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात होईल.

मतमोजणी दुपारी दोनपर्यंत अंतिम टप्प्यात येईल. त्यापूर्वी फेरीनिहाय कल लक्षात येताच कोणता उमेदवार विजयी होणार हे स्पष्ट होईल; मात्र सर्व प्रक्रिया पूर्ण करून विजयी उमेदवाराची अधिकृत घोषणा करण्यास सायंकाळी 4.30 ते 5 वाजतील, असे त्यांनी स्पष्ट केले.

मोजणीसाठी 1 हजार 530 कर्मचारी

मतमोजणीसाठी विधानसभा मतदारसंघनिहाय एकूण 1 हजार 530 अधिकारी व कर्मचारी नेमण्यात आले आहेत. प्रत्येक विधानसभा मतदारसंघनिहाय सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, इतर अधिकारी, सूक्ष्म निरीक्षक, मतमोजणी पर्यवेक्षक, मतमोजणी सहाय्यक, तालिका कर्मचारी, शिपाई, हमाल, इतर कर्मचारी वर्ग नेमण्यात आला आहे. पनवेलसाठी एकूण 338 अधिकारी व कर्मचारी आहेत. कर्जतसाठी एकूण 218 अधिकारी व कर्मचारी नियुक्त आहेत. उरणसाठी एकूण 199 असे मनुष्यबळ आहे. मावळसाठी एकूण 229 मनुष्यबळ आहे. चिंचवडसाठी सर्वांधिक 356 अधिकारी व कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. पिंपरीसाठी एकूण 190 अधिकारी व कर्मचारी आहेत.

मोबाईल, इलेक्ट्रिक घड्याळ, लॅपटॉप आणण्यास बंदी

निवडणुकीच्या मतमोजणीची फेरीनिहाय आकडेवारी मतमोजणी केंद्राच्या ठिकाणाहून ध्वनिक्षेपकाद्वारे वेळोवेळी घोषित केली जाईल. मतमोजणी केंद्रामध्ये उमेदवार, निवडणूक प्रतिनिधी तसेच, मतमोजणी प्रतिनिधी यांना मोबाईल, पेजर, कॅलक्युलेटर, टॅब, इलेक्ट्रॉनिक रिस्ट वॉच आदी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू सोबत बाळगण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. तसेच, हत्यार, चाकू, शस्त्र, धारदार वस्तू, काडेपेटी, लायटर, ज्वलनशील पदार्थ आदी वस्तू बाळण्यास मनाई आहे. मतमोजणी प्रतिनिधी, उमेदवार व निवडणूक प्रतिनिधी यांनी मतमोजणी प्रक्रियेदरम्यान ओळखपत्र परिधान करणे आवश्यक आहे. कुठल्याही अनधिकृत व्यक्तीला मतमोजणी कक्षात प्रवेश दिला जाणार नाही.

महायुती व महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांसाठी वेगवेगळी व्यवस्था

उमेदवार, मतमोजणी प्रतिनिधी, निवडणूक प्रतिनिधी तसेच, अधिकृत माध्यम प्रतिनिधींना श्री शिव छत्रपती क्रीडा संकुलाच्या मुख्य प्रवेशद्वारावरून प्रवेश दिला जाईल. निवडणूक कामकाजासाठी नियुक्त करण्यात आलेल्या अधिकारी कर्मचार्यांना राजवाडा गेटने प्रवेश दिला जाईल. 150 मीटर परिसरात इतरांना प्रवेश दिला जाणार नाही. महायुतीच्या कार्यकर्त्यांसाठी आर्चिड हॉटेल येथे आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांसाठी राजवाडा हॉटेल या ठिकाणी थांबण्याची वेगवेगळी व्यवस्था केली आहे. स्पीकरवरून फेरीनिहाय मतांची आकडेवारी प्रसिद्ध केली जाणार आहे. मतमोजणीच्या ठिकाणी बंदोबस्तासाठी 54 वरिष्ठ अधिकारी व 300 पोलिस कर्मचारी नेमण्यात येणार आहेत, असे अतिरिक्त पोलिस आयुक्त वसंत परदेशी यांनी केले.

मतदानाची टक्केवारी

मावळ लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीसाठी 13 मे रोजी एकूण 2 हजार 566 मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडली. एकूण 54.87 टक्के एवढे मतदान झाले. एकूण 25 लाख 85 हजार 18 पैकी 14 लाख 18 हजार 439 मतदारांनी मतदान केले. त्यात 7 लाख 77 हजार 742 पुरुष, 6 लाख 40 हजार 651 महिला आणि 46 तृतीयपंथी मतदार आहेत.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news