

Political News: विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असले, तरी अद्यापही महाविकास आघाडीचे उमेदवार निश्चित झालेले नाहीत. लोकसभा निवडणुकीत खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना बरीच जुळवाजुळव करावी लागली व अनेकांना विधानसभा निवडणुकीत उमेदवारीचा शब्ददेखील द्यावा लागला. हा आता शब्द ते पाळतात का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
जुन्नर विधानसभेत काँग्रेसचे नेते व विघ्नहर साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर यांना, तर आंबेगाव तालुक्यात आपल्याच पक्षाचे देवदत्त निकम यांना, तर खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघात शेवटच्या क्षणी भाजपमधून पक्षप्रवेश केलेले अतुल देशमुख यांना उमेदवारी देण्याचा शब्द खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी दिला होता. तो ते पाळणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना सुरुवातीला निवडणूक तशी कठीणच होती. डॉ. कोल्हे यांच्याविरोधात संपूर्ण मतदारसंघात मोठ्या प्रमाणात नाराजी होती. परंतु, राज्यातील राजकीय घडामोडी आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेली फूट डॉ. कोल्हे यांच्या पथ्यावर पडली.
निवडणुकीत डॉ. कोल्हे यांना ऐनवेळेस अनेक राजकीय समीकरणांची जुळवाजुळव करावी लागली. जुन्नर विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार अतुल बेनके हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच राहिल्याने आपल्या होमपिचवर खासदारांना महाविकास आघाडीतील मित्रपक्षांच्या नेते, कार्यकर्त्यांबरोबर जुळवून घ्यावे लागले.
यात सत्यशील शेरकर हा हुकमी एक्का डॉ. कोल्हे यांना सापडला. लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीतच शेरकर यांना विधानसभेच्या उमेदवारीचे आश्वासन मिळाल्यावर त्यांनी हात सैल सोडत तालुक्यातील सभा, रॅली व इतर अनेक गोष्टींसाठी निवडणुकीत खर्च करताना मागे-पुढे पाहिले नाही. यामुळेच आता शेरकर यांना पूर्णपणे खात्री आहे की, आपले मित्र खासदार डॉ. अमोल कोल्हे हे आपल्याला दिलेला शब्द पाळतील व उमेदवारी निश्चित होईल.
यामुळेच सध्या शेरकर यांच्याकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची सर्व पूर्वतयारी पूर्ण झाली आहे. आंबेगाव विधानसभा मतदारसंघात लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात डॉ. कोल्हे यांच्यापेक्षा देवदत्त निकम यांचाच प्रचार अधिक झाला. निकम यांना विधानसभेची उमेदवारी जाहीर झालीच आहे, या पध्दतीने निकम आणि कार्यकर्ते कामाला लागले आहेत. परंतु, निकम यांना देखील अद्याप कोणतेही स्पष्ट संकेत मिळालेले नाहीत.
खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघात देशमुख यांचा भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात झालेला प्रवेश विधानसभेच्या उमेदवारीवर लक्ष ठेवूनच झाला होता. परंतु, शरद पवार गटातून निष्ठावान लोकांनाच संधी दिली जाईल, असा विश्वास ठेवून सुधीर मुंगसे यांनी जोरदार तयारी केली आहे. खेडमध्ये मुंगसे की देशमुख, कुणाला उमेदवारी मिळणार, आणि खासदार डॉ. अमोल कोल्हे उमेवारीसाठी दिलेला शब्द पाळणार का, याकडे संपूर्ण शिरूर लोकसभेचे लक्ष लागले आहे.