

पुणे: राज्यात बीडीपी आणि हिलटॉप, हिलस्लोपबाबत प्रत्येक ठिकाणचा प्रश्न वेगवेगळा असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विविध ठिकाणच्या बीडीपी आणि हिलटॉप, हिलस्लोपनुसार प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार पुढील काळात राज्याचे याबाबत एकत्रित धोरण ठरविण्यात येणार असल्याची माहिती नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिली.
मिसाळ यांनी शुक्रवारी पालिकेमध्ये शहरातील विविध विकासकामे, प्रकल्पांचा आढावा घेतला. या वेळी महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांच्यासह सर्व विभागप्रमुख व अधिकारी उपस्थित होते.
मिसाळ म्हणाल्या, एका वर्षाच्या विकासकामांचा आढावा नगरविकासमंत्री या अनुषंगाने घेतला. जे प्रकल्प प्रलंबित आहेत, त्याबाबत आणि त्यातील अडचणींसंदर्भात चर्चा झाली. राज्य सरकारकडून नेमक्या काय अपेक्षा आहेत, हे जाणून घेतले. समान पाणी योजना, मालमत्ता कर, कॅन्टोन्मेंट विलीनीकरणाबाबत या वेळी चर्चा झाली. तसेच रस्ता खरवडल्यानंतर 24 तासांत डांबरीकरण करा; अन्यथा ठेकेदारासह महापालिकेच्या इंजिनिअरवर कारवाई करण्याच्या सूचना मिसाळ यांनी या वेळी केल्या.
कारभारी होण्यासाठी चढाओढ?
केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह काही आमदारांनी शहराच्या प्रश्नांवर गेल्या आठवड्यात महापालिकेत आढावा बैठक घेतली. या बैठकीत ज्या विकासकामांचा आढावा घेतला, ज्या विषयांवर चर्चा झाली, त्याच विषयांवर शुक्रवारी राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी महापालिकेत स्वतंत्र आढावा बैठक घेतली. त्यामुळे भाजपमध्ये पुण्याचा कारभारी होण्यासाठी चढाओढ तर सुरू नाही ना? अशी चर्चा महापालिकेत रंगली होती.
ऐनवेळी बैठक लावल्याने येणे शक्य झाले नाही: मिसाळ
दोन स्वतंत्र बैठकांबाबत विचारले असता राज्यमंत्री मिसाळ म्हणाल्या, ऐनवेळी बैठक लागल्यामुळे पूर्वीच्या बैठकीला येणे शक्य झाले नाही. नगरविकासमंत्री या नात्याने एक वर्षाच्या विकासकामांचा आढावा या बैठकीत घेतला. जे प्रकल्प प्रलंबित आहेत, त्याबाबत आणि त्यातील अडचणी, यासंदर्भात चर्चा केली.